अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला गुन्हे शाखा ८ च्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. रंजना राठोड आणि बिरबल बळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वांद्रे खाडीजवळ नुकताच एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. गुन्हे शाखा ८ चे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी हा मृतदेह पुण्यातील वाहन चालक मनोहर राठोड याचा असल्याचे शोधून काढले. त्यानंतर पुण्यात जाऊन शोध घेतला असता राठोड तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. त्याची पत्नी रंजना राठोड ही सुद्धा प्रियकर बिरबल बळे (२२) याच्यासह बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन पुण्यातील रांजणगाव येथून रंजना आणि तिचा प्रियकर बिरबलला ताब्यात घेतले. याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले की, रंजनाचे याच भागात राहणाऱ्या बिरबलशी अनैतिक संबंध होते. त्याची कुणकूण मनोहरला लागली होती. त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे मनोहरचा काटा काढण्याची या दोघांनी योजना बनवली. दोघांनी मनोहरला मुंबईत फिरण्याच्या निमित्ताने आणले. बेसावध क्षणी त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून त्याची हत्या केली. कसलीच ओळख पटू नये म्हणून त्याच्याकडील ओळखपत्र आणि सर्व कागदपत्रे नष्ट करून टाकली होती. गुन्हे शाखा ८ चे पोलीस निरीक्षक राजू कसबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीशचंद्र राठोड,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जोशी, अमोल काळे आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास लावून आरोपींना अटक केली.