कृषी आणि पशुपालन, भाषा, समाजशास्त्र, कला अशा विविध विषयांवरील दर्जेदार प्रकल्पांच्या मांडणीने पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आविष्कार’ या स्पर्धेच्या विद्यापीठ स्तरावरील फेरीस बुधवार सुरुवात झाली.
मूलभूत शास्त्रांमधील नवे शोध, प्रदेशानुरूप भाषेचे स्थान, विविध भाषांचे स्थान, कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान, पारंपरिक शेती अशा विविध विषयांवरील दर्जेदार प्रकल्प ‘आविष्कार २०१२’ मध्ये सादर करण्यात आले आहेत. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांतील आणि विभागातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपले प्रकल्प सादर केले असून २६ आणि २७ डिसेंबरला विद्यापीठस्तरावरील फेरीस सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये मूलभूत शास्त्र, कृषी आणि पशुपालन, भाषा, समाजशास्त्र, कला, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी, आरोग्य आणि औषधनिर्माण अशा विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले आहेत. प्रत्येक विषयामध्ये विद्यापीठाच्या पातळीवर निवडण्यात आलेले प्रकल्प राज्यस्तरावरील फेरीसाठी पाठवण्यात येणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाने या स्पर्धेमध्ये चार वेळा सर्वसाधारण विजेतेपद आणि एकदा उपविजेतेपद पटकावले आहे. जानेवारीमध्ये या स्पर्धेची राज्यस्तरीय फेरी होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला, कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी ‘आविष्कार’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये पदवी, पदव्युत्तर, एम.फील., पीएच.डी., या स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही सहभागी होता येते.