मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांसह इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी येथे काँग्रेसचा नाशिक विभागीय मेळावा होत असून शहरात प्रथमच पक्षाचा अशा प्रकारचा विशाल मेळावा होत असल्याने त्यास महत्व प्राप्त झाले आहे. अलीकडेच जिल्ह्यात झालेल्या चारही पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला हादरा देत काँग्रेसने दैदिप्यमान यश मिळविल्याने नंदुरबारला या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे म्हटले जात असून या यशाची किनार मेळाव्यास राहणार आहे.
जिल्ह्य़ातील चारही पालिकांमध्ये काँग्रेसने घवघवीत यश मिळविले आहे. अनेक ग्रामपंचायती काँग्रेसने ताब्यात घेतल्या आहेत. नंदुरबार हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यास राष्ट्रवादीने हादरा दिला होता. अर्थात एखाद्या पक्षापेक्षा आदिवासी विकास विभागासमोर काँग्रेसला हार पत्करावी लागली, असे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे याआधी आदिवासी विकास खाते होते, हे यासंदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. त्यानंतर काँग्रेसच्या विरोधामुळे मंत्रिमंडळ फेरबदलात डॉ. गावितांकडून हे खाते काढून घेण्यात आले.
आदिवासी विकासाच्या नावाने होणारा मनमानी कारभार तसेच अतिरेक थांबल्याने जिल्ह्य़ात अलीकडेच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये बदल झालेला दिसून आल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.
जीटीपी महविद्यालयाच्या मैदानाव होणाऱ्या या मेळाव्यास काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात यांसह इतरही अनेक मंत्री, आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभेच्या आगामी निवडणुकांचे रणशिंग या मेळाव्याव्दारे फुंकले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील काँग्रेस प्रेमींनी मेळावा यशस्वी करावा तसेच मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रघुवंशी यांनी केले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विरेचक प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन होणार असल्याचेही रघुवंशी यांनी सांगितले.    
तापीचे पाणी शेतात पोहचण्यासाठी सिंचन योजना कार्यान्वित करा, दुर्गम व आदिवासी जिल्ह्य़ातील कुपोषण व स्थलांतर रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा प्रकल्प राबवावा, नगरपालिकांना सक्षम करण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या वेळेवर वेतनासाठी अनुदानात वाढ करावी, हातोडा
पुलासाठी खा. माणिकराव गावित यांच्या निधीतून केंद्र सरकारने १५ कोटी रूपये मंजूर केले असले तरी उर्वरित २० कोटीची रक्कम आदिवासी विभागाने देवून पुलाचे काम पूर्णत्वास न्यावे, या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहेत.