दिल्ली येथील घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून रोडरोमियोविरूद्ध स्वत:हून त्यांनी मोहीम उघडली आहे. गेल्या १५ दिवसांत २५हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच आता मुलींमध्येही धीटपणा आला असून त्या पोलिसांकडे स्वत:हून तक्रारी करत आहेत. पोलिसांना असा अनुभव प्रथमच आला
आहे.
शहरात बोरावके व डाकले महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींची कर्मवीर चौक ते महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावर छेडछाड काढली जाते. अनेकदा मुलींचा पाठलाग केला जातो. पण, दिल्ली येथील घटनेनंतर मुलींमध्ये जागृती आली असून त्या छेडछाड करणाऱ्यांचा प्रतिकार करू लागल्या आहेत. तसेच पोलिसांना दूरध्वनी करून गुंडांची नावेही कळवू लागल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाई करणे पोलिसांना सोपे झाले आहे. अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी चोप दिला आहे. दोन्ही मार्ग व बसस्थानक परिसर छेडछाडमुक्त करण्याचा मनोदय पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी व्यक्त केला आहे.
मुलांना शाळेत सोडणाऱ्या एका तरूण महिलेचा, तसेच एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा क्लासला जाताना पाठलाग केला जात होता. दोघींनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. कमांडो पथकाने छेडछाड करणाऱ्या दोन्ही तरूणांना पकडून तुरूंगाची हवा दाखविली.
गुरूनानक चौक ते महाविद्यालय व सय्यद बाबा दर्गा ते संतलक रूग्णालय या भागात निरीक्षक सपकाळे हे स्वत: दररोज गस्त घालतात. आज ते गस्त घालीत असताना दोन मुले मुलींची छेडछाड करताना त्यांना आढळून आले. दोघांनाही त्यांनी पोलीस कोठडीची हवा दाखविली.
एका मुलीचे नाव आपल्या मोटारसायकलवर टाकून तिचा पाठलाग करण्यात येत होता. मुलीने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत आरोपीस गजाआड केले. निरीक्षक सपकाळे हे विविध शाळा महाविद्यालयात जाऊन व्याख्याने देत आहेत. विद्यार्थिनींनी कोणत्याही दबावाला न भीता तक्रारी कराव्यात, आम्ही कारवाई करू, असे ते सांगत आहेत. त्यांनी महाविद्यालयांचे प्राचार्य व विद्यालयांचे मुख्याध्यापकांच्या भेटी स्वत:हून घेतल्या असून छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पोलिसांना देण्यात यावीत, असे आवाहन केले आहे. विद्यार्थीनी अथवा विद्यार्थ्यांनी गुंड, गुन्हेगार व छेडछाड करणाऱ्यांची नावे ०२४२२-२२२६६६ किंवा ९५९४९४५४२६ या क्रमांकावर कळवावीत, नावे कळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले. शहरात गस्त घालणारे कमांडो व पोलिसांनाही माहिती कळवावी, तसेच
सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना,
स्वयंसेवी संघटना, ज्येष्ठ नागरिक
यांच्यामार्फतही पोलिसांकडे माहिती कळविता येऊ शकेल, असे ते म्हणाले.