नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेल्या मोझरी उड्डाण पुलाच्या कामाला नुकत्याच मोझरीत झालेल्या बैठकीत सर्वानुमती मिळाली असून या पुलाचे काम आता येत्या शुक्रवारी, ३ मे रोजी सुरू होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे अमरावतीपर्यंतचे काम ऑक्टोबर २०१० ला सुरू झाले. सध्याच्यास्थितीत मोझरी उड्डाण पुलाव्यतिरिक्त सर्व काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोझरी उड्डाण पुलाचे काम आवश्यक आहे.
अमरावती विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली मोझरीच्या गुरुकुंज आश्रमात झालेल्या बैठकीत या उड्डाण पुलाच्या कामाला सर्वानी अनुमती दिली.
या बैठकीला गुरुदेव सेवाश्रमाचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी, आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, मोझरीचे सरपंच चंद्रकांत वडस्कर, गुरुदेवनगरचे सरपंच नीलेश राऊत, उपविभागीय अधिकारी तेजुसिंग पवार, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अमरावती प्रकल्प संचालक नरेश वडेतवार, व्यवस्थापक एस.एस. कदम, मे. आर.आर.बी. तळेगाव-अमरावती प्रा. लि.चे प्रकल्प संचालक संपतकुमार व व्यवस्थापक सावळकर आदी उपस्थित होते.
बैठकीत विभागीय आयुक्तांनी या उड्डाण पुलाच्या आवश्यकतेबाबत विश्लेषण केल्यानंतर बोथे गुरुजी, आमदार ठाकूर, सरपंच वडस्कर व राऊत यांनी पाच मिटरचे २० गाळे व दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन पादचारी भूयारी मार्ग याप्रमाणे काम करण्यास अनुमती दिली. पुलाचे बांधकाम ३ मे रोजी सुरू करण्याचे निश्चित झाले असून यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे बैठकीला उपस्थित मान्यवरांनी मान्य केले. यामुळे अमरावती-नागपूर प्रवास करणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.