महापालिकेतील घरपट्टी, पाणीपट्टी विभागातील कर्मचारी २०१४-१५ या वर्षांत सुटीच्या दिवशीही वसुलीचे काम करत असताना आयुक्तांनी त्यासंदर्भात स्पष्ट आदेश देण्याची मागणी ‘सेवास्तंभ’ या अखिल भारतीय कर्मचारी महासंघाच्या महापालिका शाखेने आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
घरपट्टी, पाणीपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना २०१४-१५ या आर्थिक वर्षांच्या वसुलीसाठी नोटीसद्वारे कामकाज करण्यास सूचित करण्यात आले. यापूर्वीच्या २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४ या आर्थिक वर्षांत घरपट्टी, पाणीपट्टटी कर्मचाऱ्यांकडून शनिवार, रविवार, सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रशासनाने काम करून घेतले. पण केलेल्या कामाचा मोबदला देण्याची वेळ आली असता आयुक्तांचे स्पष्ट आदेश नसल्याने जादा कामाचा मोबदला देता येणार नाही असा पवित्रा प्रशासनाने घेतला होता. सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यासंदर्भात माजी आयुक्तांनी वेळोवेळी आदेश काढलेले असताना त्या आदेशानुसार प्रशासकीय स्तरावर कार्यवाही झालेली नाही. २०१२-१३, २०१३-१४ या दोन वर्षांच्या जादा कामाच्या मोबदल्यासाठी माजी आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी १४ ऑगस्ट २०१४ रोजी आदेश काढून जादा कामाच्या मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावला. पर्यायी सुटी देण्याची तरतूद नसताना मनपाचे मूल्य निर्धारण कर संकलन विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी पत्रान्वये कामगार आयुक्तांना घरपट्टी, पाणीपट्टी, कर्मचाऱ्यांनाा २०१२-१३, २०१३-१४ या वर्षांतील सुटीच्या दिवशी केलेल्या जादा कामाचा मोबदला देण्याऐवजी पर्यायी सुटी देण्याबाबत मनपा प्रशासनाकडून कार्यवाही प्रस्तावित असल्याचे लेखी कळविले. त्याबाबतचा निर्णय अद्याप कामगार आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचेही सेवास्तंभने म्हटले आहे.
२०१४-१५ या वर्षांत घरपट्टी, पाणीपट्टी कर्मचारी सुटीच्या दिवशी जाहीर नोटीसच्या आधारे पुन्हा नियमितपणे कामकाज करत असून समान काम समान वेतन कायद्याचे पुन्हा उल्लंघन मनपा प्रशासनाकडून होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. मनपा कर्मचाऱ्यांना सुटीच्या दिवशी कामावर येण्याबाबत आदेश मनपा प्रशासनाकडून अद्याप निर्गमित झालेला नाही. त्यामुळे मनपाचे नियुक्ती प्राधिकारी म्हणून तसे आदेश त्वरीत निर्गमित करण्याची मागणी सेवास्तंभ शाखेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश अहिरे यांनी केली आहे.