महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने सोलापूर येथे मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यशाळा शनिवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी होत असून, या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली. याच दिवशी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत असून खासगी शाळांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा होणार आहे.    
समितीचे राज्याध्यक्ष रसाळे म्हणाले, की खासगी शाळांची ‘शालार्थ’ वेतन प्रणाली व इतर प्रश्नावर होणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन शिक्षण संचालक महावीर माने यांचे होणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष रसाळे हे असणार आहेत.
या वेळी सोलापूरचे नूतन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेंद्र बाबर, प्रशासनाधिकारी सत्यवान सोनवणे व उपशिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे यांचे मार्गदर्शन होणार आहे. डॉ. निर्मलकुमार फडकुले सांस्कृतिक सभागृह येथे होणाऱ्या कार्यशाळेनंतर राज्य कार्यकारिणीची बैठक दुपारी ४ वाजता होत असून खासगी शाळांच्या प्रलंबित मागण्या व आंदोलनाची पुढील दिशा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी राज्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रसाळे यांनी केले आहे.