उपेक्षित पारधी समाजाला कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांचे प्रबोधन केले जात आहे. पारधी मुक्ती आंदोलन चळवळीची ही भूमिका पारधी जमात व समाज व्यवस्थेतील अंतर कमी करणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करताना, अंधश्रद्धा व निरक्षरता हद्दपार केल्याशिवाय पारधी समाजात परिवर्तन अशक्य असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तोडकर यांनी व्यक्त केले.
पारधी मुक्ती आंदोलनातर्फे पारध्यांच्या पालावर आयोजित भाऊबीज कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पारधी मुक्ती आंदोलनाचे विभागीय अध्यक्ष अनिल कांबळे होते. पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे, राजू खाने, दादा मोरे, प्रशांत पवार, कस्तुरा पवार, रेश्मा पवार, टेगर पवार, विजय वायदंडे, युवराज गोखले, ज्वाला काळे, तात्या पवार, स्वाती पवार आदींसह पारधी बांधव उपस्थित होते.
प्रमोद तोडकर म्हणाले, की अंधश्रद्धा व निरक्षरतेला हद्दपार करण्यासाठी पारधी भगिनींनी पुढाकार घेण्यासह अनिष्ट रूढी, परंपरांना नाकारण्याची मानसिकता बनवावी लागेल. त्याशिवाय पारधी समाजाचे परिवर्तन शक्य नाही हे गांभीर्याने घेणे हिताचे ठरेल.
प्रकाश वायदंडे म्हणाले, की गेल्या दहा-बारा वर्षांतील सामूहिक प्रयत्नामुळे या समाजाच्या व्यथा सरकार, प्रशासन आणि समाज व्यवस्थेला समजू लागल्या आहेत. पारधी मुक्ती आंदोलनाच्या भूमिकेला पारधी भगिनींची साथ मिळाल्यानेच पुनर्वसनाच्या कामाला यश प्राप्त होऊ लागले आहे. प्रास्ताविक चंबळय़ा पवार यांनी केले. शिवाजी पवार यांनी आभार मानले.