नागरिकांनी शहरातील सावेडी रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीच्या काचा फोडून किमती ऐवज पळवणा-या तरुणाला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याने तब्बल ११ मोटारींच्या काचा फोडून चो-या केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
शिवाजी लक्ष्मण वाफारे (वय २७, रा. संघर्ष चौक, सावेडी, मूळ रा. कर्जुले हर्या, पारनेर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दि. २७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. प्रेमदान चौकाजवळील बिग बाजार समोर त्याला शाखेचे निरीक्षक अशोक ढाकणे, सहायक उपनिरीक्षक कृष्णा वाघमारे व राजेंद्र आकसाळ, हवालदार राकेश खेडकर, भाऊसाहेब वाघ, योगेश गोसावी, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने पकडले.
वाफारे याने सावेडी रस्त्यावरील प्रेमदान चौक ते अप्पू हत्ती चौक ते दिल्लीगेट या दरम्यानच्या रस्त्यावर गेल्या वर्षभरात अनेक मोटारींच्या काचा फोडून चो-या केल्या. नागरिक कामानिमित्त रस्त्याच्या कडेला मोटारी पार्क करतात. वाफारे हा मोटारीच्या खिडक्यांच्या काचा स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने उचकटून मोटारीतील ऐवज लांबवत असे. अशा पद्धतीने त्याने केलेल्या ११ गुन्हय़ांची कबुलीही पोलिसांकडे दिली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून रोख ७३ हजार रु., तीन मोबाइल, एक लॅपटॉप, एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने, दोन डिजिटल कॅमेरे, महिलांच्या दोन पर्स असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.