नगर-कल्याण महामार्गावर तालुक्यातील धोत्रे शिवारात सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एसटी बस व स्विफ्ट कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन एकजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले.
नगरहून आळेफाटय़ाकडे चाललेली स्विफ्ट कार (एमएच १६-२०४६) व आळेफाटय़ाकडून नगरकडे  जाणा-या वसई-औरंगाबाद या एसटी बसशी धोत्रे शिवारात समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचा वेग इतका होता, की अपघातानंतर स्विफ्टचा पुढचा भाग बसखाली घुसला. कारच्या दर्शनी भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या अपघातात सचिन मच्छिंद्र चिपाडे (वय ३२, रा. चिपाडे मळा, नगर) याचा जागीच मृत्यू झाला तर नितीन अशोक म्हस्के (वय २९), निखिल मूलचंद शेटिया (वय २८) व सागर बाळासाहेब शिंदे (वय २९, सर्व रा. नगर) हे तिघे जबर जखमी झाले. तिघाही जखमींना नगरच्या आनंदऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
अपघाताची माहिती समजल्यानंतर सहायक फौजदार राजपूत, महेश भवर, भास्कर लबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे सोपास्कार पूर्ण केले. जखमींना नगरच्या रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर मृत सचिन चिपाडे याचा मृतदेह टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तो नातलगांच्या ताब्यात देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 killed 3 injured after bus and car collide
First published on: 03-09-2013 at 01:57 IST