रेशनचा तांदूळ काळया बाजारात विक्री करीत असताना दोघांना रंगेहात पकडून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दोन मालमोटारी व त्यात असलेला तांदूळ असा ७ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. काल (शुक्रवारी) रात्री साडेअकरा वाजता बाभळेश्वर शिवरातील सतलज धाब्यावर ही कारवाई करण्यात आली.
खुदाबक्ष शेख (रा.नागापूर, नगर)व देविदास बबन मिसाळ (रा.अतुळनेर ता.आष्टी) या दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील शासकीय गोदामातून तांदूळ भरुन वितरणासाठी संगमनेर, राहाता या भागात नेण्यात येत होता. रात्री या मालमोटारी सतलज धाब्यावर थांबवून हा तांदूळ काळया बाजारात विक्रीसाठी दिला जात होता. त्याची माहिती तहसीलदार आप्पासाहेब िशदे, नायब तहसिलदार राहुल कोताडे, पुरवठा निरीक्षक माधव टिळेकर यांच्या पथकाने पोलिसांना समवेत घेऊन सदर धाब्यावर छापा मारला. पुरवठा निरीक्षक माधव टिळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोणी पोलिसांनी खुदाबक्ष शेख व देविदास मिसाळ यांच्या विरोधात जिवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.