कृत्रिम दूध तयार करण्यासाठी रसायनांचा पुरवठा करणा-या नगरच्या दोघा व्यापा-यांची राहुरी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांना गुन्ह्यात आरोपी केले जाण्याची शक्यता आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी टाकळीमियाँ (ता. राहुरी) शिवारातील मोरवाडी येथील प्रमोद बाळासाहेब घोरपडे याला कृत्रिम दुधासह अटक केली होती. रसायनांपासून दूध बनवून तो वांबोरी परिसरातील एका दूधप्रकल्पात दुधाचा पुरवठा करीत असे. घोरपडे याच्याकडून रसायने, दूधपावडर, कॅन व एक मोटार जप्त केली होती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून घोरपडे याला अटक केली आहे. घोरपडे याच्या कृत्रिम दुधाची वाहतूक करणा-या मोटारीचा चालक विष्णू लक्ष्मण घोरपडे याला आरोपी करण्यात आले आहे. तो प्रमोद घोरपडेचा चुलता आहे.
घोरपडे याला नगरच्या सावेडी येथील कल्पक एंटरप्रायजेसमधून एएसटी छाप दुधाच्या पावडरचा पुरवठा केला जात होता. ही पावडर मान्यताप्राप्त नाही. भेसळीकरिता या पावडरचा वापर केला जातो. याप्रकरणी पोलिसांनी सागर पिपाडा नावाच्या व्यक्तीची चौकशी केली. अद्याप त्यास अटक झालेली नाही. मात्र कल्पक एंटरप्रायजेसचे नाव आरोपीच्या यादीत आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीतील अभय अनिल पितळे यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून घोरपडे याने कृत्रिम दूध तयार करण्याकरिता रसायने विकत घेतली होती. पितळे यांना आरोपी करण्यात आलेले नाही, मात्र चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांना आरोपी केले जाईल, असे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महावीर परमार यांनी सांगितले.
कृत्रिम दूधप्रकरणी कसून तपास केला जाईल, तसेच घोरपडे याच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनी सांगितले. दूधभेसळप्रकरणी अनेक संशयित फरार झाले आहेत. त्यांना अटक करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.