अकोले-संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीपात्राची वाळू उपसा व अन्य कारणांमुळे झालेली झीज थांबवून नदीपात्र स्थिर करण्याच्या उद्देशाने प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल बांधण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच प्रयोग आहे.
निळवंडे धरण ते ओझर बंधारा (संगमनेर) दरम्यान एकूण २९ प्रोफाईल वॉल बांधण्यात येणार असून, त्यासाठी ४१ कोटी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अपेक्षेप्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातून या बंधाऱ्यांना विरोध होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार मधुकरराव पिचड यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणत्याही परिस्थितीत प्रवरेवरील हे प्रस्थावित बंधारे होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
अकोले तालुक्यात निळवंडे ते कळस २२.५ किमी व संगमनेर तालुक्यात कळस ते ओझर बंधारा २८.२ किमी अशी एकुण ५०.७ किमी नदीपात्राची लांबी आहे. मागील काही वर्षांत प्रवरा नदीपात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा झाला त्यामुळे प्रवरा नदीपात्राच्या मुळ रचनेत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. वाळू उपशामुळे नदीची खोली वाढून पात्राची व नदीकाठाची धूप झालेली आहे. नदीपात्राचे सध्या होत असलेले व भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी प्रवरा नदीपात्राचे सर्वेक्षण करून प्रोफाईल संरक्षित करण्यासाठी व प्रवरा नदीवर प्रोफाईल वॉल बांधून नदीची मूळ संरचना अबाधित ठेवण्याची मागणी पिचड तसेच हरिश्चंद्र सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे सहकारी फेडरेशन यांनी केली होती.
अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर सामुदायिक व सहकारी अशा १०१ व संगमनेर तालुक्यात २८८ अशा एकूण ३९० उपसा सिंचन योजना आहेत. तसेच या दोन्ही तालुक्यांत व्यक्तिगत स्वरूपाच्या अनुक्रमे ५०६ व ८७२ अशा एकूण १ हजार ३७८ उपसा सिंचन योजना असून पिण्याच्या पाण्याच्या व अन्य ३१ बिगर सिंचन योजना आहेत. संगमनेर व अकोले तालुक्यातील सुमारे ८ हजार हेक्टर क्षेत्र उपसा सिंचनामुळे ओलिताखाली आलेले आहे. बिगर सिंचनासाठी ३०० दलघफू पाण्याचे आरक्षण आहे.
भंडारदरा ते ओझर बंधारा दरम्यान प्रवरा नदीस पाटबंधारे विभागाने कालवा म्हणून अधिसूचित केले आहे. त्यामुळे प्रवरा नदीची तळपातळी ही कालव्याच्या तळपातळीप्रमाणे असणे अभिप्रेत आहे. मात्र प्रवरा नदीत मूळ नदीची तळपातळी वाळूउपसा व त्या अनुषंगाने झालेली झीज यामुळे खोल गेलेली आहे.
जलसंपदा विभागाने या सुमारे ५० किमी नदीपात्राचे सर्वेक्षण केले. अकोले व संगमनेर तालुक्यातील नदीपात्रातील नदीउतार, काटछेद, वाळूचा थर आदी बाबी भिन्न आहेत. या दोन तालुक्यात नदीपात्रातील वाळूच्या थराची सरासरी खोली ४ मीटर आहे. नदीचा उतार व झालेली धूप या आधारे निळवंडे ते कळसपर्यंत (अकोले तालुका) १६ व कळस ते ओझर (संगमनेर तालुका) १३ असे एकुण २९ प्रोफाईल वॉल प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या प्रोफाईल वॉलचे बांधकाम आरसीसी पध्दतीने करण्यात येणार असून सध्याच्या नदीपातळीपासून प्रोफाईल वॉलची उंची १ मीटर धरण्यात आली आहे. तसेच दोन्ही तीरावर १५ मीटर लांबीच्या गाईड वॉलही बांधण्यात येणार आहेत. या प्रोफाईल वॉलचा उद्देश फक्त नदीपात्राचा वाळू उपसा व अन्य कारणांनी झालेली झीज थांबून नदीपात्र स्थिर करणे हा आहे. त्यात पाणीसंचय करणे प्रस्तावित नाही. प्रोफाईल वॉलमुळे नदीचे पात्र स्थिर झाल्याने नंतर ते नैसर्गिक स्थितीत आल्यावर त्यावर आधारित असणारा बिगर सिंचन व उपसा सिंचन योजनांना शासनाने मंजूर केलेले पाणी घेता येणे शक्य होईल असे या प्रस्तावात नमूद करण्यात आलेले आहेत. प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असून प्रस्तावास तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार आहे.
भंडारदरा धरण सन १९२६ मध्ये बांधून पूर्ण झाले. ओझरपासून निघणाऱ्या धरणांच्या कालव्यांवर आजपर्यंत कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले, मात्र भंडारदरा ते ओझर दरम्यानचे नदीपात्र कालवा म्हणून अधिसूचित केलेले असूनही या नदीपात्रासाठी आजपर्यंत शासनाने काहीच खर्च केलेला नाही. आता प्रथमच संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून प्रोफाईल वॉल बांधण्याचा प्रस्ताव आहे. नदीपात्रात १ मीटर उंचीचे हे बंधारे झाल्यानंतर नदीपात्राची धूप थांबणार आहे. तसेच बंधाऱ्यातील पाण्यामुळे वाळूउपशासही प्रतिबंध होणार आहे. भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाणही वाढणार असून नष्ट झालेले नदीतील जलजीवन पुन्हा जिवंत होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पर्यावरणपूरक असल्याचे सांगण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 29 profile wall until ozar dam
First published on: 23-05-2013 at 01:33 IST