‘मकृवि’चे मोसंबी संशोधन केंद्र करणार ३ लाख रोपांची निर्मिती

दुष्काळामुळे मराठवाडय़ातील ४० टक्के मोसंबीच्या बागा नष्ट होणार आहेत. यामुळे पुढील वर्षी किमान अडीच ते तीन लाख नव्या रोपांची मागणी येणार असल्याने मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राने ३ लाख रोपे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून परभणी, औरंगाबाद आणि बदनापूर येथे रोगमुक्त रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे.

दुष्काळामुळे मराठवाडय़ातील ४० टक्के मोसंबीच्या बागा नष्ट होणार आहेत. यामुळे पुढील वर्षी किमान अडीच ते तीन लाख नव्या रोपांची मागणी येणार असल्याने मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राने ३ लाख रोपे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून परभणी, औरंगाबाद आणि बदनापूर येथे रोगमुक्त रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे.
मराठवाडय़ात मोसंबीचे एकूण ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. पैकी एकटय़ा जालना जिल्ह्य़ात २७ हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड आहे. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना मोसंबी लागवडीबाबत अद्ययावत तंत्रज्ञान मिळावे, रोगमुक्त रोपांची उपलब्धी व्हावी, या साठी सरकारने २७ फेब्रुवारी २००६ रोजी जालना जिल्ह्य़ातील बदनापूर येथे मोसंबी संशोधन केंद्राची स्थापना केली. कृषी महाविद्यालयाला लागूनच असलेल्या ४० एकर जमिनीवर हे संशोधन केंद्र उभारण्यात आले. लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये मोसंबीचा दर्जात्मक विकास व उत्पादनात सुधारणा करणे, विशिष्ट विभागनिहाय तग धरतील अशा मोसंबीच्या नवीन जाती तयार करणे, पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण, फळ प्रक्रिया, रोगमुक्त मोसंबी रोपांची पैदास ही सर्व उद्दिष्टे बदनापूरच्या संशोधन केंद्रात साध्य झाली आहेत. सध्या या केंद्रामध्ये १५ प्रकारची मातृवृक्षाची लागवड केली आहे. त्यात नागपूरच्या एन.आर.सी.सी. केंद्रातून आलेल्या न्यू सेलर, काटोलगोल्ड, न्यू सेलर संत्रा, रंगपूर लाईन, जंबेरी यांचा समावेश आहे.
मराठवाडय़ात भीषण दुष्काळ पसरला आहे. दुष्काळाचा फटका फळबागांना बसला आहे. ज्या भागात पावसाचे प्रमाण ४९ टक्क्य़ांपेक्षा कमी आहे, अशा स्थितीत मोसंबी बागा जगवणे शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. आजपर्यंतच्या आर्थिक पिकांचा विचार केल्यास मोसंबीनेच शेतकऱ्यांना सर्वार्थाने आधार दिला आहे. त्यामुळे या वर्षी मोसंबी बागा वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना उपाययोजना संशोधन केंद्राने सुचवल्या आहेत.
ठिबकद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून आच्छादनाचा वापर करावा, त्यासाठी प्लास्टिकचा किंवा उसाच्या पाचटाचा तसेच इतर काडीकचऱ्याचाही उपयोग करू शकतात, झाडांच्या फांद्या व पाने कमी करावीत, झाडावर बाष्परोधकांची फवारणी करावी, त्यासाठी केओलीन ८ टक्के तीव्रतेची किंवा पोटॅशियम नायट्रेटची १.५ टक्के तीव्रतेची फवारणी करावी, मटका सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास मुळ्यांना पाणी मिळावे व आठवडय़ात २० लिटर पाणी मिळाले तरी झाडे जगू शकतील.
पुढील वर्षी नव्याने मोसंबीची लागवड करण्यासाठी अडीच ते तीन लाख रोपांची मागणी शेतकऱ्यांतून होणार आहे. त्यासाठी रोपे कमी पडू नये म्हणून बदनापूरच्या या मोसंबी संशोधन केंद्राने तीन लाख रोपे निर्मितीचे काम हाती घेतले आहे. ही रोपे मराठवाडा कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती रोप वाटिका, औरंगाबाद येथील संशोधन केंद्र तसेच बदनापूरमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती संशोधन केंद्राच्या वतीने विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक धवण, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. डी. के. पाटील यांनी दिली.
या संशोधन केंद्रामध्ये तूर व हरभरा या कडधान्य पिकांवरही संशोधन करण्यात येत आहे. बी.डी.एन.९-१३, बी.डी.एन. आकाश विकास, विश्वास, विजय ही हरभऱ्याची वाणे तर बी.डी.एन.७११, ८५३ यासारखी वाणे या संशोधन केंद्राने निर्माण केली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3 lacs plants production from sweet lemon reserch centre

ताज्या बातम्या