जिल्ह्य़ातील दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून सर्वानाच आता मे महिन्यात किमान एकदोन तरी अवकाळी पावसाची प्रतीक्षा आहे. तसे झाले तर नियमित पावसापर्यंतचे दिवस किमान सुसह्य़ होतील अशी प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.
धान्याची टंचाई नाही पण त्यापेक्षाही भयंकर अशी पाणी टंचाई मात्र जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागाला ग्रासून आहे. तब्बल ५२३ टँकर्सने सध्या ४०६ गावे व १ हजार ६५३ वाडय़ावस्त्यांना सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ९ लाख २१ हजार ९१५ लोकसंख्येला याचा लाभ होतो आहे. सर्वाधिक म्हणजे ९० टँकर पारनेर तालुक्यात ६५ गावे, २६० वाडय़ा-वस्त्यांसाठी सुरू आहेत. जिल्ह्य़ात फक्त श्रीरामपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.
तालुकानिहाय टँकर्सची संख्या पुढीलप्रमाणे आहे. गावे-वस्त्या-टँकर या क्रमाने. संगमनेर- २२ गावे- २०६ वस्त्या-५२ टँकस. अकोले- २-१२-०४, कोपरगाव- ०८-३८-०७, राहुरी-०१-०६-०२, नेवासे-१६-६६-१७, राहाता- १०-८१-१३, नगर- ४२-२३०-६२, पाथर्डी- ७०-१०९-६४, शेवगाव- ३२-७२-३०, कर्जत- ६३-२९४-७२, जामखेड- ४९-३१-७१ आणि श्रीगोंदे- २६-२४८-३९.
जनावरांच्या छावण्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. २ लाख १३ हजार ३० इतक्या मोठय़ा संख्येने लहानमोठी जनावरे सध्या छावणीत आहेत. जिल्ह्य़ातील ८ तालुक्यांत ३३७ छावण्या सुरू आहेत. छावणी चालकांचाही धीर आता चाऱ्याचा वाढता भाव व त्या तुलनेत सरकारकडून अनुदानात सतत होणारी कपात यामुळे खचू लागला आहे.
रोजगार हमीच्या कामावर आतापर्यंत मजुरांची संख्या कमीच होती. मात्र आता या कामावरही मजुरांची संख्या वाढू लागली आहे. २४ हजार ५१९ मजूर सध्या ठिकठिकाणी काम करत आहेत. त्यांच्यासाठी १ हजार २४८ कामे सुरू करण्यात आली आहेत. ७ लाख मजुरांना सामावून घेईल अशी १८ हजार ९८५ कामे जिल्हा प्रशासनाने तयार ठेवली असून मागणी होताच ती सुरू करता येतील.
टँकर्सच्या संख्येप्रमाणेच रोजगार हमीच्या योजनेवरही पारनेर तालुक्यातच सर्वाधिक म्हणजे ५ हजार ८६० मजूर काम करत आहेत. अन्य ठिकाणच्या मजुरांची तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- नगर-१ हजार ६१३, शेवगाव- १ हजार ८६७, पाथर्डी- २ हजार ०८२, श्रीरामपूर- ३०, राहाता- २१८, नेवासे- २७६, राहुरी- ९७, संगमनेर- ९९५, कोपरगाव- ४३६, अकोले- १ हजार ०८७, कर्जत-४ हजार ८८४, जामखेड- ३ हजार ३६८, श्रीगोंदे- १ हजार ७०६.