आकर्षक लाभ देणारी गुंतवणूक योजनेची भुरळ पाडून अनेक मध्यमवर्गीयांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेऊन नंतर फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू किसनसा जित्री (वय ४३, रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यास न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात जित्री याच्याविरूध्द सहा लाखांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक दीपंकर गेनसिध्द गायकवाड (रा. जगदंबानगर, ज्ञानेश्वर नगरजवळ, जुळे सोलापूर) यांनी नोंदविली होती. तसेच इतरांना जित्री याने सुमारे पावणेपाच लाखांस गंडा घातला होता. त्याने गायकवाड व इतरांना कांचनलक्ष्मी इन्व्हेस्टमेंट अ‍ॅन्ड सेक्युरिटीज शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीबाबत माहिती देऊन या कंपनीत पन्नास हजारांची गुंतवणूक केल्यास ७ हजार तर एक लाखाच्या गुंतवणुकीवर १५ हजारांचा लाभ व पाच लाखांच्या गुंतवणुकीवर प्रॉफिट शेअिरग मिळण्याचे आमिष दाखविले होते. त्यास बळी पडून अनेक गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात रकमा जित्री याच्याकडे गुंतविल्या होत्या. नंतर काही महिने जित्री याने लाभांश दिला. त्यामुळे सर्वाचा विश्वास वाढला आणि गुंतवणूकदारही वाढले. मात्र नंतर जित्री याने फसवणुकीचा गोरख धंदा सुरू केला. या गुन्ह्य़ात अटक झाल्यानंतर जित्री यास पोलिसानी न्यायदंडाधिकारी ए. बी. कुरणे यांच्यासमोर हजर केले असता आणखी नऊ गुंतवणूकदारांनी आपण जित्री याच्याकडून फसले गेल्याची कैफियत अ‍ॅड. शांतवीर महिंद्रकर यांच्यामार्फत न्यायालयात मांडली. त्यावर जित्री यास सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला. याप्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. प्रशांत नवगिरे, तर सरकारतर्फे अ‍ॅड. एस. एस.शिंदे, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष न्हावकर यांनी बाजू मांडली.