आयुष्यात काही तरी मोठे ध्येय प्राप्त करून दाखविण्याची इच्छा माणसाला प्रेरणा देत असते. ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक खाचखळगे त्याला पार करावे लागतात, अनेक माणसांचे सहकार्य त्याला घ्यावे लागते. ध्येय प्राप्त केले की मिळणारा आनंद अवर्णनीय असला तरी तिथपर्यंतचा प्रवास, त्यात येणारे कटू अनुभव त्याच्या लक्षात राहतात, बरेच काही शिकवून जातात. वास्तव कादंबरीवर आधारित ‘७२ मैल एक प्रवास’ हा चित्रपटही बालवयातील नायक असोका याला असाच अनुभव देऊन जातो, जो त्याचे पुढचे आयुष्य घडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. परंतु जगण्याचे शिक्षण त्याला मिळत असले तरी पडद्यावरचा चित्रपट त्याव्यतिरिक्त एक फिका, फारसा प्रभावी न वाटणारा ७२ मैलांचा प्रवास ठरतो. सत्तरच्या दशकातील काळ मात्र कॅमेरा आणि कला दिग्दर्शनाने पडद्यावर सुंदर उतरविला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व कलावंतांचा अभिनय हे चित्रपटाचे सामथ्र्य ठरले आहे.
अशोक व्हटकर लिखित आत्मपर पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. शाळकरी वयातील अशोकला त्याच्या व्रात्यपणाला कंटाळून त्याचे आई-वडील रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील वसतिगृहात शिकण्यासाठी जबरदस्तीने पाठवतात. तिथल्या वातावरणाला वैतागलेला अशोक अखेर पलायन करतो आणि पुन्हा आपल्या घरी कोल्हापूरला जाण्याचे ठरवितो. खिशात एक पैसा नसताना कोल्हापूरला एसटीने जाणे शक्य नाही म्हणून तो सातारा-कोल्हापूर चालत प्रवास करून जातो. हे अंतर ७२ मैलांचे आहे. ७२ मैलांच्या या प्रवासातील असोकाचे अनुभव चित्रपटातून दाखविले आहेत.
खिशात पैसे नाहीत, रस्ता माहीत नाही, पण नको ते वसतिगृह अशी अवस्था झालेल्या अशोकला फक्त घरी पोहोचण्याचे एकच ध्येय इतके लांबचे अंतर चालत जाण्यासाठी प्रेरित करते. यातच लहानग्या अशोकचे धाडस दिसून येते. आजच्या काळात इतके लांबचे अंतर चालत जाणे याची कल्पनाच केलेली बरी. म्हणून अशोकचा हा प्रयत्न ही दिग्दर्शक-पटकथाकारांची चित्रपट बनविण्यामागची प्रेरणा ठरली असावी. या प्रवासात अशोकचा असोका होताना त्याला राधाक्का आणि तिची मुले भेटतात आणि जगण्याचा अर्थ, जगण्यातला वैयर्थ, माणूसपण, समाजाचे वागणे, जन्म-मरण याचा अर्थ असोकाला उमगतो, जो त्याला पुढल्या आयुष्यातील प्रवासासाठी अनमोल ठरतो. चार मुलांची आई राधाक्का असोकाला भेटते तेव्हा तीसुद्धा आपल्या मुलांना घेऊन आपल्या माहेरी कायमचा आसरा शोधायला निघालेली आहे. लग्नानंतर लाभलेल्या आयुष्यातील टक्केटोणपे, कठीण प्रसंग, कुटुंबाची झालेली वाताहत, पोटाची खळगी भरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, स्वाभिमानाने जगण्यासाठी होणारी राधाक्काची तगमग अशा अनेक गोष्टींद्वारे राधाक्काची व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने उभी केली आहे. मार्मिक संवादांतून राधाक्का आयुष्याविषयी, जगण्याविषयी जे तत्त्वज्ञान मांडू पाहतेय, ते असोका कानात आणि मनात साठवतो. राधाक्काच्या तान्ह्य़ा बाळाचा मृत्यू, नंतर राधाक्काच्या बारा-तेरा वर्षांच्या मोठय़ा मुलाचा नाग डसून होणारा मृत्यू, तान्ह्य़ा बाळाच्या मृत्यूनंतर त्याला जमिनीत पुरताना त्याच्या सख्ख्या भावंडांनी पलीकडच्या वावरात दिसणारे टोमॅटो खाण्यासाठी घेतलेली धाव अशा प्रसंगांतून दिग्दर्शकाने अन्नाची भूक या माणसाच्या मूलभूत गरजेसाठी माणसाची होणारी अवस्था टोकदारपणे दाखवली आहे.
राधाक्काची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री स्मिता तांबे आणि चित्रपटाचा लहानगा नायक असोकाची व्यक्तिरेखा साकारणार बालकलाकार चिन्मय संत यांचा अभिनय हे चित्रपटाचे खरे सामथ्र्य ठरते. भारावून टाकणारा अभिनय स्मिता तांबेने केला असून राणू या व्यक्तिरेखेद्वारे चिन्मय कांबळी तसेच बायजा व भीमा या अन्य दोन लहानग्या बहिणींची भूमिका साकारणाऱ्या श्रावणी सोलास्कर व ईशा माने अशा सर्वच बालकलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. छायालेखन आणि कला दिग्दर्शन याद्वारे १९७० च्या दशकातील प्रभावीपणे उभे करणारे संजय जाधव व अभिषेक रेडकर यांनाही श्रेय द्यावेच लागेल.
७२ मैलांचा धाडसी प्रवास पायी करणारा असोका, त्याच्या प्रवासातील अनुभव यात नाटय़ नक्कीच आहे; परंतु हे नाटय़ दाखविताना आणखी काही प्रभावी प्रसंग हवे होते असे वाटून जाते. त्यामुळे ९३ मिनिटांत दिग्दर्शकाने घडविलेला ७२ मैलांचा प्रवास अपूर्ण वाटतो. म्हणूनही प्रेक्षकाला फिका प्रवास वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७२ मैल एक प्रवास
निर्माते- अश्विनी यार्दी, टिं्वकल खन्ना
पटकथा लेखक, दिग्दर्शक – राजीव पाटील
संवाद व गीते – संजय पाटील
लाईन प्रोडय़ूसर – दीपक राणे
संकलन – राजेश राव
मूळ कादंबरी – अशोक व्हटकर
छायालेखक – संजय जाधव
कला दिग्दर्शक – अभिषेक रेडकर,
वासू पाटील
संगीतकार – अमितराज
कलावंत – स्मिता तांबे, चिन्मय संत, चिन्मय कांबळी, ईशा माने, श्रावणी सोलास्कर व अन्य.

मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 72 mail ek pravas light journey of life values
First published on: 11-08-2013 at 06:52 IST