शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त वाई व इतर तालुक्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतांना पालखीत बसवून स्नानासाठी कृष्णामाईच्या पवित्र नदीत वाईच्या गणपती घाटावर वाजत गाजत आणण्यात आल्याने गणपती घाटाला यात्रेचे स्वरु प आले होते.
दरवर्षीप्रमाणे श्रावणातील शेवटच्या सोमवारी विविध गावांच्या ग्रामदैवतांच्या पालख्या ढोल- झांजेच्या निनादात गुलालाची उधळण करीत शहरात मिरवणुकीने गणपती घाटावर आणण्यात येत होत्या. विधिपूर्वक ग्रामदैवतांना स्नान घालून त्यांची पूजा व आरती करण्यात येऊन त्यानंतर पुन्हा वाजत गाजत गावाकडे जात होत्या. गणपती घाटावर मिठाई, खेळणी व हार फुलांची दुकाने मांडल्याने या परिसराला यात्रेचे स्वरु प आले होते. या वेळी मांढरदेव व परिसरातील पालख्यांनी परिसर फुलून गेला होता. मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची पालखी विश्वस्त रामदास क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, सचिव अभिजित कचरे, लक्ष्मण चोपडे, गेणु हेरकळ, सरपंच काळूराम क्षीरसागर आदींनी गणपती घाटावर आणून देवीस विधिवत स्नान घालून पूजा-अर्चा केली.
वाई शहरातील व परिसरातील श्री भद्रेश्वर, श्री वाकेश्वर, श्री केदारेश्वर, श्री तपनेश्वर, श्री हरिहरेश्वर, श्री काशीविश्वेश्वर आदी मंदिरांमध्ये दर्शनासाठी आबालवृद्धांच्या रांगा लागल्या होत्या. ज्या त्या मंदिरामध्ये त्या मंदिरातील पुजाऱ्यांनी शंकराच्या पिंडीवर धान्याच्या आकर्षक पूजा मांडल्या होत्या. भाविक मनापासून दर्शन घेऊन समाधान व्यक्त करीत होते.
या वेळी ढोल-लेझमीच्या तालावर गुलालाने माखलेले तरूण किसनवीर चौकात ढोल, झांजांच्या निनादात मनसोक्त नाचत होते. स्नानानंतर ग्रामस्थांनी आपापल्या देवतांच्या पालख्या गावी परत नेल्या.
गणपती घाटावर व शहरात पोलीस निरीक्षक रमेश गलांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.