भाजपचा आंदोलनाचा इशारा
रस्त्यावरील खड्डे, रस्त्याच्या कडेने खोल गेलेली बाजू यामुळे नाशिक  तेपेठ हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक होत असून अपघातांमुळे हा रस्ता म्हणजे जणू काही मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेष म्हणजे पेठमार्गे हाच रस्ता गुजरातमध्ये जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास रस्त्यावरील उमराळे बुद्रुक चौफुलीवर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा भाजपच्या वतीने सुनील केदार यांनी दिला आहे.
नाशिक-पेठ रस्ता हा वाहतुकीमुळे सदैव गजबजलेला असतो. गुजरातशी जोडणाऱ्या या रस्त्याचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे वाहनांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. उमराळे बुद्रुक येथील चौफुली तर अपघाताचे ठिकाणच बनली आहे. नाशिकहून पेठकडे जाणारा कंटेनर रस्त्याच्या खाली उतरल्याने झालेल्या अपघातात उमराळ्याहून नाशिककडे येत असलेले शेतकरी व उमराळे बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेचे संचालक यादव केदार यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी झाली. या परिसरात आजपर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. तथापि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. नाशिक-पेठमार्गे गुजरातकडे जाणारा हा रस्ता अत्यंत अरुंद व एकेरी असल्याने रस्ता चारपदरी करण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग न केल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम खोळंबले असल्याचे सांगण्यात येते.
दिंडोरी मतदारसंघ लोकसभेसाठी राखीव आहे. या भागात आदिवासी योजनांमधून अनेक विकास कामे करता येणे शक्य आहे, परंतु शासन सतत दुर्लक्ष करत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे बुजवावेत, रस्त्याच्या कडेला पक्का मुरूम टाकण्यात यावा आणि रस्ता ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करावा अशा मागण्या भाजपच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास भाजपच्या वतीने उमराळे बुद्रुक येथील चौफुलीवर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा कादवा साखर कारखाना आणि वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक सुनील केदार यांनी दिला आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident trap on nashik to peth road
First published on: 11-06-2013 at 09:07 IST