आजूबाजूची परिस्थिती सर्वाना समजावून सांगण्याची आचार्य अत्रे यांची ऊर्मी फार मोठी होती. त्या काळात आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती देणारी नियतकालिके आणि इंटरनेट नसूनही अत्र्यांना जागतिक भान होते, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले.
आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती आणि प्रमुख ग्रंथसंग्रहालये, वाचनालये, सामाजिक, साहित्य आणि शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त वतीने बुधवारी मुलुंडच्या मराठा मंडळ सभागृहात आचार्य अत्रेंच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून गिरीश कुबेर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘एबीपी माझा’ वाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर होते.
आचार्य अत्रे जयंती समितीचे अध्यक्ष शं. रा. पेंडसे, मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश शिर्के, चंद्रशेखर वझे, सूर्यकांत वैरागी आणि नितीन देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. गिरीश कुबेर यांनी अत्रेंच्या पत्रकारितेतील विविध पैलूंचे महत्त्व यावेळी विशद केले. अत्रे ठरवूनच पत्रकारितेत आले होते. त्यांनी आयुष्यात जे काही केले ते सगळे ठरवून केले. ‘ही गोष्ट करायला हवी होती, ही करायला नको होती’, असे त्यांना कधीच वाटले नाही. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आजूबाजूची परिस्थिती सर्वाना समजावून सांगण्याची त्यांची ऊर्मी खूप मोठी होती. अत्रेंची लेखणी त्यावेळी तुफान काम करत होती. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या आजच्या काळातील तरुणांनी त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. समोरच्यावर लेखणीने वार करण्याची आचार्य अत्रेंची ताकद खूप मोठी होती. आचार्य अत्रे पुण्यात काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते. पक्षात सक्रिय असतानाही त्यांनी स्वपक्षीयांवर प्रहार करण्याचे सोडले नाही. मात्र पुढे पक्षाच्या परिघात राहून पत्रकारिता करणे शक्य नाही, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी पक्षाचा झेंडा खाली ठेवला. पक्षाचा ध्वज खाली ठेवून त्यांनी केलेली पत्रकारिता हे त्यांच्या प्रामाणिक पत्रकारितेचे द्योतक होते, असे कुबेर म्हणाले.
अत्र्यांनी लिहिलेले मृत्युलेख खूपच प्रसिद्ध असून अनेकदा त्यांच्यावरून वादंग झाले. दुधात कुस्करलेल्या जास्वंदाची उपमा त्यांनी नेहरूंच्या चमकत्या व्यक्तिमत्त्वाला दिली होती. साने गुरूजी हे बालमुखी फूल होते असे वर्णन चपखलपणे अत्र्यांनी केले होते. सावरकरांवर काचेच्या कपाटातील सिंह अशी केलेली टीका आणि आंबेडकरांवरील टीकेवरून अत्रेंवर नागपूरमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता, असे सांगून कुबेर म्हणाले, अत्रे चांगले शिक्षक होते. त्यामुळेच ते चांगले पत्रकार होऊ शकले. त्यांच्या पत्रकारितेमध्ये शिक्षकाचा अंश होता. अत्रे आपल्याकडच्या गोष्टी अत्यंत सोप्या पद्धतीने मांडू शकत होते. त्यांची काव्यात्मकता ज्ञानेश्वरांशी नाते सांगणारी होती. पत्रकारिता हा व्यवसाय असल्याने त्यातील धंदेवाईकता त्यांना मान्य होती, पण धर्माचा धंदा मांडणे योग्य नाही, असे त्यांचे ठाम मत होते.   
 राजीव खांडेकर यांनी मराठी भाषेचा होत असलेला संकोच चिंताजनक असल्याचे म्हटले. त्याला प्रसारमाध्यमेही जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी समाजाइतकीच माध्यमांची आहे. माध्यमांकडून मांडलेल्या जनमत चाचण्यांमध्ये अंदाज वर्तवले जातात. मात्र हे अंदाज आपल्याविरोधात असतील तर राजकीय मंडळी माध्यमांवरच चिखलफेक करतात हे दुर्दैवी असल्याचे खांडेकर म्हणाले. श्रेयश्री वझे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.