भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व महानगरपालिका सभागृहात जाणे आवश्यक होते. म्हणूनच आम्ही नगरसेवक व पदाधिका-यांनी त्यांना स्वीकृत सदस्य व्हावे यासाठी आग्रह धरला, असे भारतीय जनता पक्षाचे मनपातील गटनेते दत्ता कावरे यांनी सागितले.
महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी आगरकर, स्थायी समिती सदस्यपदी नंदा साठे व दत्ता कावरे, महिला बालकल्याण समितीच्या सदस्यपदी लता ढोणे व नलावडे यांची निवड झाल्याबद्दल पक्ष व नगरसेवकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कावरे बोलत होते.  
आगरकर म्हणाले, आपण दोन पैशाचे कोणाचे लाजीणदार नाही. ग्रामदैवताच्या सेवेत पिढय़ानपिढय़ा असणा-या परिवारात जन्मलो आहोत. आयुष्यभर आपण चारित्र्य जपले, परंतु कोणी माझ्यावर पातळी सोडून आरोप करत असेल तर कार्यकर्त्यांनी त्याला मोठय़ा मनाने माफ करावे, असे आवाहन आगरकर यांनी केले. सन २००९च्या मनपा निवडणुकीत पक्षाने मला निवडणूक प्रमुख म्हणून एकटय़ावर जबाबदारी सोपवली होती, परंतु आपण पक्षाचे खासदार, आमदार, ज्येष्ठ पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवली. पक्षाला भरघोस यश मिळाले. परंतु हे यश निवडणूक प्रमुखाचे नव्हते तर सामूहिक प्रयत्नांचे होते. दोन महिन्यांपूर्वीच्या मनपा निवडणुकीत सामूहिक नेतृत्वाचे प्रयत्न केले, दुर्दैवाने अपयश आले, परंतु पक्षाला आलेल्या अपयशाचे भांडवल करून कोणी टीका करत असेल तर ते योग्य नाही, असे आगरकर म्हणाले.
मनपाच्या निवडणुकीत प्रचारप्रमुखाची जबाबदारी पार पाडती यावी यासाठीच आगरकर यांनी निवडणूक लढवली नाही. पक्षासाठी थांबण्याच्या त्यांच्या या भूमिकेचा त्या वेळचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रदेश समितीच्या सभेत कौतुक केले, असा गौरव माजी शहराध्यक्ष सुनील रामदासी यांनी केला.
या वेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, श्रीपाद छिंदम, महिला आघाडी अध्यक्ष गीता गिल्डा, मनीष साठे, अशोक कानडे, दामू बठेजा, गौतम दीक्षित, अन्वर खान, अनिल गट्टाणी, विलास नंदी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agarkars experience required in municipal kaware
First published on: 18-02-2014 at 02:40 IST