कवितेवर प्रेम करणाऱ्या रसिकांनी निखळ कवितेसाठी चालवलेली अक्षर चळवळ म्हणून मराठी साहित्य वर्तुळात ‘वाटा कवितेच्या’ या कार्यक्रमाची नोंद घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील नामवंत कवींची हजेरी आणि कवितेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, असे या कार्यक्रमाचे स्वरुप राहिले आहे. कोणताही राजकीय नेता, सहकारसम्राट अथवा उद्योजक यांच्या आश्रयावर कार्यक्रम न घेता  साहित्यातल्याच माणसांनी पदरमोड करत तो सामूहिकपणे पार पाडावा, हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़!
मकरसंक्रांतीला परभणीत ‘वाटा कवितेच्या’ हा कार्यक्रम दरवर्षी होतो. कार्यक्रमाला आजवर महाराष्ट्रातल्या वेगवेगळया भागातल्या कवींनी हजेरी लावली. केवळ टाळ्याखाऊ अथवा हास्य कवितांचे सादरीकरण न करता कवितेकडे गांभीर्याने पाहणाऱ्या, आशयघन कवितांची निर्मिती करणाऱ्या कवींना ‘वाटा कवितेच्या’ कार्यक्रमात बोलावले जाते. दरवर्षी नव्या कवींना संधी दिली जाते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. यंदा ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना शब्द सह्याद्री साहित्य सन्मान देऊन गौरविले जाणार आहे. रोख ११ हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी रोहित नागभिडे, रंगनाथ खेडेकर, दगडू लोमटे, प्रा. श्रीधर भोंबे, ‘कवितारती’चे संस्थापक संपादक प्रा. पुरूषोत्तम पाटील आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले. सत्कार सोहळ्यानंतर कवी संमेलन होणार आहे. प्रभा गणोरकर (अमरावती), श्रीकांत देशमुख (नांदेड), वीरधवल परब (सिंधुदुर्ग), लता ऐवळे (पुणे), भरत दौंडकर (शिरूर), पी. विठ्ठल (नांदेड) यांच्या सहभागाने हे संमेलन होत आहे.
निखळ कवितेसाठी चालवलेल्या या उपक्रमाने महाराष्ट्रात लौकिक निर्माण केला. अजीम नवाज राही, रमेश इंगळे उत्रादकर, प्रकाश होळकर, प्रकाश घोडके, संतोष पद्माकर पवार, बालाजी मदन इंगळे, डॉ. वृषाली किन्हाळकर, प्रकाश किनगावकर, श्रीधर नांदेडकर, रवी कोरडे, अभय दाणी आदींसह जवळपास तीसेक कवींनी या संमेलनाला हजेरी लावली आहे. आतापर्यंत केशव सखाराम देशमुख, पृथ्वीराज तौर, शिवाजी अंबुलगेकर, यशपाल िभगे आदींनी यात सूत्रसंचालन केले. केवळ कवितेसाठी एखादी अक्षर चळवळ असावी, या उद्देशाने ‘वाटा कवितेच्या’ कार्यक्रमाची निर्मिती झाली. कोणताही आर्थिक आश्रय या कार्यक्रमाला नाही. साहित्य क्षेत्रातल्या माणसांनीच आपले योगदान देत हे व्यासपीठ उभे केले. कवी इंद्रजित भालेराव, आसाराम लोमटे, भारत काळे, आनंद देशपांडे, केशव खटींग, दिलीप शृंगारपुतळे, भगवान काळे, कल्याण कदम, बबन आव्हाड, विठ्ठल भुसारे, अरुण चव्हाळ आदींचे परिश्रम या व्यासपीठाच्या मागे आहेत.
निमंत्रित कवी, पाहुण्यांना कल्पक स्मृतिचिन्हे अमृता आर्ट गॅलरीचे बाळकृष्ण देबडवार यांच्या सहकार्यातून दिली जातात. यात प्रत्येक व्यक्तीला या सांस्कृतिक उपक्रमासाठी आपला वाटा उचलावा लागतो आणि हे सर्व आत्मीयतेने केले जाते. चांगली कविता टिकावी, ती रसिकांपर्यंत जावी, हीच या उपक्रमामागची धारणा आहे. एखाद्या धनिकाच्या आश्रयाने हा उपक्रम चालवला, तर त्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. या उपक्रमात मात्र मिरवणे हा आयोजकांचा हेतू नसून चांगली कविता रसिकांपर्यंत पोहोचवणे हाच प्रामाणिक उद्देश आहे. त्यामुळे आयोजकांपकी कोणीही व्यासपीठावरही दिसत नाही. कुठल्याही बारीकसारीक गोष्टीचे श्रेय न घेता खरी कविता समोर ठेवणे याच भूमिकेतून आयोजक या उपक्रमाकडे पाहतात. सुरुवातीला अनेक अडथळ्यांशी सुरू झालेला हा अक्षरवाटांचा प्रवास आज महाराष्ट्रातला ठळक सांस्कृतिक उपक्रम म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहे.  
उद्या मकरसंक्रांती दिनी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.