मनमानी कारभार करणाऱ्या एसटीच्या आगार व्यवस्थापकाची बदली तसेच बेकायदेशीरपणे बंद केलेल्या गाडया पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन विभाग नियंत्रक मिलिंद बंड यांनी दिले. या आश्वासनानंतर आमदार विजय औटी यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले.
येथील बसस्थानकात उभारण्यात आलेल्या खास मंडपात सकाळी पाणेदहाच्या सुमारास औटी यांनी आपले उपोषण सुरू केले. सभापती सुदाम पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख निलेश लंके, सामाजिक कार्यकर्ते शाहीर गायकडवाड व सुरेश बोरूडे, पंचायत समीतीच्या सदस्या संगिता खोडदे, सरपंच अण्णासाहेब औटी,उपसरपंच नंदकुमार देशमुख,शिवसेनेचे शहर प्रमुख विजय डोळ आदी यावेळी उपस्थित होते. उपोषण सुरू होताच तालुकाभरातील प्रवासी तसेच विद्यार्थ्यांंच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊसच पडला.
तहसीलदार जयसिंग वळवी, विभागीय अभियंता शिवाजीराव जाधव, वाहतूक अधिकारी राजेंद्र साळवे तेथे दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी आगारप्रमुख आर. टी. व्यवहारे यांच्याविषयी तक्रारी असल्याचे मान्य केले. आगार प्रमुखांना माहिती मागितल्यावर ते ती देत नाहीत, त्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून आगाराचे वेळापत्रक पुर्ववत करण्याची मागणी औटी यांनी केली.
आगारप्रमुख व्यवहारे यांना उपोषणस्थळी पाचारण करून औटी यांच्या मागण्यांविषयी विचारले असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. ही चर्चा सुरू असतानाच विभाग नियंत्रक मिलींद बंड हेही तेथे हजर झाले. येत्या दोन दिवसात पुर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे बसेस सोडण्यात येतील, विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून आगार व्यवस्थापकांची बदली करू असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर औटी यांनी उपोषण मागे घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assurance for transfer of depot manager
First published on: 12-02-2013 at 02:38 IST