अतिक्रमणांचा पडणारा विळखा हा सध्या शहरी व ग्रामीण भागातील कळीचा प्रश्न. शासकीय व सार्वजनिक मिळकतींवर होणारे हे अतिक्रमण कालांतराने कायमस्वरूपीची वसाहत बनून जाते. अस्ताव्यस्तपणे विखुरणाऱ्या अशा अतिक्रमणांना रोखण्याचा विचार महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय जागा सुरक्षित राखण्यास हातभार लागणार आहे.
शासकीय जमीन अथवा इमारत म्हटली की, त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. म्हणजे, ती जागा अथवा इमारत यांचा कोणी आपल्या फायद्यासाठी कसाही वापर केला तरी आक्षेप घेणारा किंवा विचारणा करणारे कोणी नसते, असाच एक समज आहे. काही अंशी त्यात तथ्यही असल्याचे म्हणावे लागेल, कारण लालफितीत काम करणारी शासकीय यंत्रणाच स्वत: इतकी सुस्त असते की, कोणामार्फत असे घडत असले तरी कारवाई करण्याऐवजी त्याकडे कानाडोळा केला जातो. शासकीय यंत्रणेची ही थंडगार मानसिकता ओळखून काही घटकांनी शासकीय मिळकतींना आपले लक्ष्य बनविले आहे. गावातील मोक्याची शासकीय जागा हेरायची आणि हळूहळू कच्च्या बांधकामांच्या मदतीने तिच्यावर कब्जा करावयाचा. कालांतराने त्या जागेवर पक्क्या स्वरूपाची बांधकामे करायची आणि सुखनैवपणे संसार थाटायचा. या पद्धतीने संपूर्ण जागा गिळकृंत करण्याचे उद्योग शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जोमात सुरू असतात. शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे अशा शासकीय विभागांच्या शेकडो जमिनींवर प्रचंड प्रमाणात अतिक्रमणे झाल्याची उदाहरणे आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या शासकीय मिळकतींवरील अनधिकृत बांधकामे काढणेही नंतर अवघड बनते.
ही बाब लक्षात घेऊन शासकीय मिळकतींच्या सुरक्षिततेवर या मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शासकीय व सार्वजनिक मिळकतींवर अतिक्रमण होऊ न देणे तसेच विद्रूप झालेल्या मालमत्ता पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावांचा तंटामुक्तीसाठी पात्र ठरविताना विचार केला जातो. या बरोबर गावातील शासकीय व सार्वजनिक मिळकतींवर अतिक्रमण होण्याचा धोका असतो. गावात अशा कोणकोणत्या मालमत्ता आहेत त्याची माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असते.
उपरोक्त मालमत्तांवर अतिक्रमण होणार नाही, याकरिता त्या ठिकाणी इशारावजा फलकही उभारता येऊ शकतो. शासकीय व सार्वजनिक मिळकतींवर अतिक्रमणे होऊ न देणे, विद्रूप झालेल्या मालमत्ता पूर्ववत करणे, असेही कार्यक्रम गाव समितीने हाती घेणे आवश्यक आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये उपरोक्त अंमलबजावणीला १० गुण देण्यात आले आहे. या पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतल्यास शासकीय जागांची सुरक्षितता राखली जाईल, शिवाय गावाला बकाल स्वरूपही मिळणार नाही. या अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात करता येईल.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील सत्तावन्नावा लेख.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attempt to stop encroachment in villages
First published on: 23-04-2013 at 02:20 IST