आपल्या कार्याची दखल घेऊन नागरी सत्कार करण्यात येतात. आता कोणाचा नागरी सत्कार स्वीकारायचा असा प्रश्न पडला आहे. जळगाव पालिकेने नगररत्न पुरस्कार जाहीर केला. पुरस्कार देणारे नंतर बिनभाडय़ाच्या खोलीत गेले. त्यामुळे तो पुरस्कार कागदावरच राहिला, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नुकतीच येथे कार्यक्रमात दिली.
कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे निकम यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर, प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, आयुक्त रामनाथ सोनवणे, सभापती प्रकाश पेणकर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे व इतर मान्यवर उपस्थित होते.
काही राजकीय नेते आपल्या संपर्कात असतात. मी कायद्याचा पुजारी असल्याने या मंडळींशी कायद्याच्या चौकटीतूनच संबंध ठेवून असतो. आता सत्कार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्कार करणारे काही वेळा दुसऱ्या दिवशी समोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असतात. असे पुरस्कार स्वीकारताना आपण खूप वेळा विचार करतो, असे निकम म्हणाले.