‘काशिनाथचं चांगभलं’च्या जयघोषात आणि सनई चौघडय़ाच्या निनादात लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधनच्या बगाडाची मिरवणूक निघाली.
बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त बगाडाची मिरवणूक काढण्यात येते. कृष्णा नदीच्या तीरावर सोमेश्वर येथून सकाळी पावणे अकरा वाजता बगाड मिरवणुकीस सुरुवात झाली. बगाड म्हणजे दगडी चाके असलेला रथ व सुमारे पस्तीस चाळीस फूट उंचीवर असणारं शीड. ज्याला बगाडय़ाला झुल्यावर अडकवलं जातं. या शिडाला रेशमी गोंडे, नवसाची तोरणेही बांधलेली असतात.  हे बगाड १६ ते २० बैलांच्या साहाय्याने ओढले जाते. बगाडाच्या रथावर असणारा बगाडय़ाचा मान अमोल तुळशीदास जाधव (वय ३३) यांना मिळाला होता. या बगाडाच्यामागे ग्रामदेवत भैरवनाथ, वाघजाई देवी व ज्योतीबाची पालखी असते.
मोठय़ा श्रद्धेने भाविक दर्शन घेतात. रंगपंचमी दिवशी दरवर्षी होणारे बगाड यावर्षी रविवारी आले होते. दहावी – बारावीच्या परीक्षा संपलेल्या  आणि त्यात रविवार असल्याने लाखो भाविकांनी बगाडाचे व भैरवनाथाचे दर्शन घेत बगाडाचा आनंद लुटला. गावातील बैलांनी, ठिकठिकाणी खांदे बदलत सायंकाळी साडेसहा-सात वाजता बगाड बावधन गावात पोहोचले.
या बगाड यात्रेसाठी पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, राजेंद्र बोकडे, अमोल खांडे आदी पाच अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त होता. दंगा प्रतिबंधक दल, महिला व वाहतूक पोलीस, होमगार्ड आदींचा बंदोबस्त तैनात होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bagad festival celebrated in enthusiastically
First published on: 02-04-2013 at 01:20 IST