‘अलबेला’ या चित्रपटाची निर्मिती आणि आपली अनोखी नृत्यशैली यामुळे अभिनेता भगवानदादा लोकप्रिय झाले असले तरी हा चित्रपट १९५१ मध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी १९३१ सालापासून भगवानदादा चित्रपटात काम करीत होते. आपल्या संबंध कारकीर्दीत तब्बल ४५०-५०० हून अधिक मूकपट तसेच बोलपटांमध्ये त्यांनी काम केले होते. गुरूदत्त तसेच राज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांनीही अनेकदा चित्रिकरणविषयक मार्गदर्शन भगवानदादांकडून घेतले आहे, ही बाब फारशी कुणाला ठाऊकही नसावी. फक्त अभिनय आणि नृत्य यापलीकडे जाऊन चित्रपट निर्मितीच्या सर्व अंगांचे अनुभवजन्य ज्ञान त्यांना होते. भगवानदादांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची चित्रपटाच्या माध्यमातून आजच्या प्रेक्षकांना ओळख करून देण्याचे आव्हान दिग्दर्शक निरंजन पटवर्धन आणि निर्माता डॉ. मोनीश बाबरे यांनी पेलले आहे. परंतु, यासंदर्भात संशोधन करीत असताना तरुणपणीचे भगवानदादा कसे होते हे दाखविणारी छायाचित्रे उपलब्ध झालेली नाहीत.
भगवानदादा यांची तरुणपणातील छायाचित्रे असल्यास संबंधितांनी आवर्जून ही छायाचित्रे या प्रकल्पासाठी उपलब्ध करून द्यावीत आणि या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोलाचा वाटा उचलावा असे कळकळीचे आवाहन निर्माता-दिग्दर्शक यांनी केले आहे. छायाचित्रांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल याची खात्री बाळगावी असेही चित्रपटकर्त्यांनी म्हटले       आहे.
अधिक माहितीसाठी निरंजन पटवर्धन (९७६९२४५०२२) अथवा अरूण पुराणिक (९३२२२१८६५३) यांच्याशी संपर्क साधावा. त्याचबरोबर  albelathefilm@gmail.com  या ईमेलद्वारेही संपर्क साधता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagvan dada photo is required for albela movie
First published on: 29-01-2013 at 12:25 IST