गेल्या काही वर्षांपासून मुंबईत उफाळलेल्या ‘मराठी-अमराठी’ या वादामुळे उत्तर भारतीय आणि मराठी माणूस दुरावल्याचे चित्र निर्माण झाले असताना एका चित्रपटाद्वारे या दोन प्रदेशांतील माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत आहे. ‘डीआर २’ या निर्मिती संस्थेच्या ‘पावर’ या मराठी चित्रपटातील एका आयटम साँगमध्ये चक्क भोजपुरी आयटम गर्ल सीमा सिंग थिरकणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत २५० हून अधिक आयटम साँग्जवर नाचलेल्या सीमाचा हा मराठी चित्रपटातील पहिलाच नाच आहे.
आमचा ‘पावर’ हा चित्रपट राजकारण यावर आधारलेला आहे. राजकारण हा महासागर आहे आणि त्यात पोहताना आपल्या चालीचा अंदाज कोणालाही येणार नाही, याची काळजी ते घेतच असतात. या विषयावर चित्रपट करावा, असे मनापासून वाटल्याचे कथा, पटकथा आणि संवाद लेखक राजू मेश्राम यांनी ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना सांगितले. आमची कथा ही पूर्णपणे मुंबईत घडते. कथेत एखादे कॉस्मोपॉलिटन गाणे असणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही हे गाणे चित्रपटात समाविष्ट केले आहे. या गाण्यासाठी सीमा सिंगची निवड करण्यामागचा त्यांचा हेतूही मोठा आहे. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील दीपाली सय्यदसारख्या अनेक तारका भोजपुरी किंवा इतर चित्रपटसृष्टींमध्ये थिरकतात. त्यामुळे आपल्या चित्रपटसृष्टीच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत. भाषेच्या कक्षा ओलांडून कलेच्या माध्यमातून दोन विभिन्न गटातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्हाला ‘पावर’मध्ये करायचा होता. रविकिशन हा भोजपुरी अभिनेता मराठी चित्रपट करून तो उत्तर भारतात प्रदर्शित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत आपणही सहभागी असावे, असे वाटल्याने आयटम साँगसाठी सीमा सिंगची निवड केल्याचे ते म्हणाले. सीमा सिंगने आतापर्यंत २५० हून अधिक आयटम साँगवर नाच केला आहे. तिच्या या अनोख्या कर्तृत्वाची दखल आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात येणार आहे. त्यामुळे तिची निवड करणे आम्हाला कठीण गेले नाही, असेही मेश्राम यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे गाणे सोनू कक्कड या अशाच प्रसिद्ध असलेल्या गायिकेने गायले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojpuri actor in marathi movie
First published on: 30-12-2012 at 01:28 IST