मागच्या आठवडयात ठाण्यातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या क्रिडा संकुलाच्या प्रांगणात एक पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले होते. गेल्या वर्ष दीड वर्षांतील ठाण्यात असे प्रदर्शन झाले नव्हते. चार आठ दिवसातच ते प्रदर्शन संपले. महाराष्ट्राच्या कानाकोपरयात अशी पुस्तकांची अनेक प्रदर्शने होतात. प्रदर्शन भरविणारया संस्था खूप आहेत त्यांची महाराष्ट्रात एक व्यवसायिक स्पर्धाच सुरू झाली आहे मात्र दुसरीकडे
यातील एकही प्रदर्शन भरविणारी संस्था ठाण्यात येत नाही. हा विषय ठाणेकरांच्या शिरगणतीतही नसेल.
ढवळे ग्रंथ यात्रेने महाराष्ट्रात पुस्तक प्रदर्शन भरवून एक नवी बाजारपेठ पुस्तकांसाठी उपलब्ध केली. पुस्तक प्रदर्शन त्या निमित्ताने विविध कार्यक्रम, लेखकांच्या भेटी, चर्चा असे छोटेखानी साहित्य संमेलन स्वरूपात प्रदर्शन भरविणारया अनेक संस्था आहेत पण त्यापकी एकही संस्था ठाण्यात येत नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत हॉल भाड्यांमध्ये झालेली वाढ.
ठाण्यात सामाजिक उपक्रमांसाठी अनेक सभागृहे उभी राहिली. एवढेच कशाला दोन नाटयगृहे उभी राहिली एक आर्ट गॅलरी आणि तिसरया नाटयगृहाचीही तयारी सुरू आहे. पण या संगळया वास्तुमध्ये पुस्तक प्रदर्शनाला आवश्यक असणारी एकही जागा उपलब्ध नाही. ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पुस्तक प्रदर्शनासाठी
एकही हॉल नाही. जे लग्न समारंभाचे हॉल आहेत त्यांची भाडी प्रदर्शन भरविणारयांना परवडत नाही. तर दुसरीकडे शाळांच्या सभागृहाचे
दरही गगनाला भिडले आहेत.
त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगणारया ठाण्यात मराठी पुस्तक प्रदर्शनासाठी हॉल नाही ही बदलत्या ठाण्यातील शोकांतिका कि सुखांतिका.
महाराष्ट्र शासनाने एक राज्यभर प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ते प्रदर्शन दरवर्षी ठाण्यात होते त्याला सरकारी खाक्याचे स्वरूप असते. तर मध्येच एकादी संस्था प्रयत्न करते. किंवा अन्य छोटी छोटी प्रदर्शने कुठेकुठे सुरू राहतात पण पुण्यात, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव एवढेच कशाला परभणी सारख्या छोटया शहरात ज्या पध्दतीने वषर्भर पुस्तक प्रदर्शनांची रेलचेल असते तशी प्रदर्शने ठाण्यातून जवळपास हद्दपार झाली.
ढवळे ग्रंथ यात्रा आणि त्यानंतर अक्षरधारा किंवा ग्रंथाली या सारख्या पुस्तक प्रदर्शन भरविणारया संस्थांनी पुस्तकांची विषयवार मांडणी, आकर्षक सवलती, जास्तीत जास्त प्रकाशकांची पुस्तके, त्यासोबत लेखकांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद अशा माध्यमातून एक प्रदर्शनाची नवी संस्कृती महाराष्ट्रात निर्माण केली. महाराष्ट्राच्या कानाकोपरयात ही पुस्तक प्रदर्शनाची संस्कृती गेल्या दहा वीस वर्षांत रूजली आणि रूळलीही. त्यापकी अनेक प्रदर्शने ठाण्यातही पुर्वी व्हायची पण ती गेल्या दोनतीन वर्षांत बंद झाली. प्रदर्शनात पुस्तक चाळायची, किंवा आपल्या आवडत्या लेखकाला प्रत्यक्ष भेटून त्याच्या स्वाक्षरीसहीत पुस्तक खरेदी करायचे याचा एक वेगळा आनंद असतो. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये असे प्रदर्शन झाले नाही की, त्या शहरातील वाचक, लेखक जिल्हा ग्रंथालयात जावून प्रदर्शन का बरं आले नाही, अशी चौकशी करू लागतात.
प्रदर्शन येण्याची वाट पाहू लागतात. त्यांना पुस्तकाच्या जत्रेची हूरहूर
लागते ती हूरहूर ठाणेकरांमध्ये संपली की काय. ठाण्यात साहित्य संमेलन झाले तेव्हा दोन कोटींची पुस्तक विक्री झाल्याचे आकडे आले होते. पुस्तकाची दुकाने ठाण्यात नाहीत असे नाही. पण मराठी भाषा जगणार की वाचणार यावरच्या चर्चा, परिसंवाद ठाण्यात वाढू लागलेत आणि प्रदर्शनाची संस्कृती विस्मृतीत जातेय म्हणून चिंता वाटली एवढेच. – प्राची