स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हुतात्मा स्मारक येथे श्री सद्गुरू सेवा मित्रमंडळाच्या वतीने प्रतिमेस ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
या प्रसंगी हुदलीकर यांनी स्वामी विवेकानंदांचे आचार व विचारच या भारताला तारू शकतील व आजच्या भरकटलेल्या तरुणपिडीने स्वामी विवेकानंदाचा आदर्श घेऊन वाटचाल करावी तसेच सदृढ व सुसंस्कृत बलशाही भारत घडवावा, असे आवाहन केले. या वेळी कार्यक्रमाचे संयोजक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश आवणकर, मनसेचे मनोज घोडके, सुनील गायकवाड, राजेंद्र शेलार, जावेद शेख, संदीप कांबेकर, सचिन गायकवाड, राजेंद्र दरेकर आदींसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
म्हसरूळ वाचनालयात पुस्तक प्रदर्शन
पंचवटीतील म्हसरूळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती वाचन कक्षात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले.
या प्रसंगी वाचनालयाचे सहखजिनदार प्रकाश उखाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष वसंत मोराडे यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली. वाचनालयाचे सभासद गिरीश पाटील यांनी युवा वाचकांसाठी सामान्य ज्ञानाच्या एकूण २५ पुस्तकांचा संच वाचनालायास भेट दिला. या वेळी उपाध्यक्ष सुबोध गावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शन पाहण्यास मेरी, म्हसरूळ परिसरातील वाचकांनी गर्दी केली होती. विनोद खैरनार यांनी आभार मानले.
येवल्यात शोभायात्रा
येवला- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येवल्यात मुख्य रस्त्याने शोभायात्रा काढण्यात आली.
स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समितीच्या वतीने आयोजित शोभा यात्रेची सुरूवात गंगादरवाजा येथील राम मंदिरापासून झाली. यावेळी काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत अखंड भारत सक्षम करण्याबाबतचे विविध फलक हातात विद्यार्थ्यांच्या हातात होते. भगवा फेटा परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शोभा यात्रेची सांगता टिळक मैदानावर झाली. या वेळी भाजपचे धनंजय कुलकर्णी, राष्ट्रवादीचे भूषण शिनकर, राजेश भांडगे आदींनी मार्गदर्शन केले. नारायणमामा शिंदे, प्रभाकर झळके, मुकेश लचके यांसह अनेक जण उपस्थित होते. सूत्रसंचालन एन्झोकेम हायस्कूलच्या उपप्राचार्यानी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bow to swami vivekanand for thier jayanti
First published on: 16-01-2013 at 02:28 IST