उमेदवारी अर्ज सादर करण्यास दोन दिवस शिल्लक असतानाच युतीची ताटातूट व आघाडीत बिघाडी झाल्याने राजकीय पक्षांना उमेदवारांची यादी जाहीर करण्यास वेळच मिळाला नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांना वेळेवर अर्ज भरण्यास सांगितल्याने सर्वत्र तारांबळ उडाली. दुसरीकडे सेनेने अन्य राजकीय पक्षातील असंतुष्टावर भर देऊन आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न केले तसेच ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी अन्य पक्षांची उमेदवारी मागिल्याचे चित्र शुक्रवारी दिवसभर दिसून आले. नागपूर ग्रामीणमध्ये खरे चित्र उद्या, शनिवारी स्पष्ट होणार आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात भाजपचे तीन, सेनेचा एक, काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक असे आमदार आहेत. भाजपच्या वाटय़ाला चार आणि सेनेच्या वाटय़ाला दोन जागा येत असत. यावेळी भाजपने विद्यमान आमदारांनाच अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, उमरेडमधून सुधीर पारवे यांनी आज अर्ज सादर केले. हिंगणामधून विद्यमान आमदार विजय घोडमारे यांना डावलून समीर मेघे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सावनेरमधून सोनबा मुसळे यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले. भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत प्राप्त होताच गेल्यावेळी भाजपाकडून लढलेले आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीला उमेदवारी मागितली. राष्ट्रवादीनेही हीच संधी साधून त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले. परंतु संध्याकाळपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. याहीवेळी देशमुख यांना भाजपतर्फे उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु सोनबा मुसळे यांनी भाजप नेतृत्वाला चक्क  इशारा दिला. त्यामुळे भाजपला त्यांच्या नावाची घोषणा करावी लागली. तर सेनेने खापरखेडय़ाचे अशोक झिंगरे यांच्या नावाला हिरवी झेंडी दाखवली. सेनेला आतापर्यंत रामटेकशिवाय दुसरीकडे मजल मारता आली नाही. काटोलला तर नेहमीच उमेदवार आयात करावा लागत असे. यावेळी मात्र सेनेने काटोलमधून नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे, हिंगणामधून माजी खासदार प्रकाश जाधव, उमरेडमधून ज.मो. अभ्यंकर, रामटेकमधून विद्यमान आमदार आशिष जयस्वाल यांना अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. रामटेकमधून भाजपने गेल्यावेळी अपक्ष म्हणून लढलेले मल्लीकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ग्रामीणमधील सहाही विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढती होतील, हे स्पष्ट झाले आहे.
यावेळी सेनेने हिंगणा मतदारसंघात माजी खासदार प्रकाश जाधव यांना उतरवले आहे. त्यामुळे येथे भाजप – सेनेची शक्ती कमी होईल, तसेच जाधव हे मूळचे रामटेक मतदारसंघातील तर समीर मेघे हे नागपुरातील असल्यामुळे त्यांना हिंगणातील मतदार कितपत स्वीकारतात, हे काळच सांगणार आहे. उमरेडचे सेना लाभ घेऊ पाहत आहेत. त्यामुळे सेनेने ज.मो. अभ्यंकर यांना मैदानात उतरवले आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसची स्थिती चांगली नाहीच. असे असले तरी काँग्रेसला हातपाय हलवण्याशिवाय पर्याय नाही. सावनेरमध्ये काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. काटोल आणि हिंगणा मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादीला कुठेच स्थान नाही. त्यामुळे काटोलमधून अनिल देशमुख आणि हिंगणामधून रमेश बंग पुन्हा नशीब अजमावून बघत आहेत. आजचे चित्र बघता जिल्ह्य़ात सहा पैकी तीन मतदारसंघात भाजप विरुद्ध सेना असाच सामना होणार असल्याचे दिसून येत आहे.  
रामटेकमध्ये काँग्रेसने डॉ. अमोल देशमुख यांना नाकारून सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली आहे.  स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते मोहिते यांच्यावर बाहेरचे पार्सल म्हणून नाराज आहे. काँग्रेसने डावलल्याने डॉ. अमोल देशमुख व पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी राष्ट्रवादीकडे धाव घेतली. एकाचवेळी दोघांनी उमेदवारी मागितल्याने राष्ट्रवादीपुढेही पेच निर्माण झाला. त्यामुळे रामटेकचा निर्णय संध्याकाळपर्यंत झाला नव्हता.
भाजपनेही रामटेकमध्ये सेनेच्या विरोधात आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज दिवसभर उमेदवारांच्या पळवापळवीसोबतच गोंधळ व संभ्रमाचे वातावरण दिसून आले.