साबरमती आश्रमात ज्या भजनांमधून गांधीजींना आनंद मिळत होता, त्या भजनांचा आस्वाद आता सामान्यांनाही मिळू शकेल. मागच्या पिढीतील लोकांच्या स्मरणरंजनाचा, तर नव्या पिढीला गांधीजींच्या व्यक्तित्वातील महत्त्वाच्या पैलूंचे दर्शन घडवण्यासाठी गांधी स्मारक निधीने गांधीजींच्या आवडत्या दहा भजनांची सीडी तयार केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी या सीडीचे लोकार्पण होत आहे.
साबरमती आश्रमात भजनात तल्लीन होणाऱ्या गांधीजींच्या अनेक आठवणी आहेत. गांधीजींची ती आवडती भजने एकत्र करून ‘साबरमती के सूर’ ही सीडी तयार करण्यात आली आहे. माधवी नानल यांनी ही भजने गायली आहेत. दांडीयात्रेत गांधीजींची सोबत करणाऱ्या आणि साबरमती आश्रमातील प्रार्थना सभांमध्ये भजनांना एकतारीची साथ देणाऱ्या नारायण खरे यांच्या स्मृतीही यानिमित्ताने जपल्या गेल्या आहेत. आजच्या पिढीला या सीडीच्या माध्यमातून गांधीजींच्या आदर्शाची माहिती होऊ शकेल, असे लक्षात आल्याने गांधी स्मारक निधीच्या अध्यक्ष उषा गोकाणी यांनी ही सीडीची कल्पना मांडली व प्रत्यक्षात आणली.
गांधी जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता भारतीय विद्या भवनात हा कार्यक्रम होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमाच्या प्रवेशपत्रिका ३० सप्टेंबरपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत भारतीय विद्या भवन, चौपाटी, गांधी स्मारक निधी, गावदेवी आणि रिदम हाऊस, काळाघोडा येथे उपलब्ध होतील.