कॉलेज लाइफ मध्ये विद्यार्थ्यांची सर्वात आवडती गोष्ट कोणती असेल तर ती गॅदरिंग अर्थात स्नेह संमेलन. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांमध्ये गॅदरिंगची सर्व जबाबदारी विद्यार्थीच पेलत असतात. नाशिकच्या एसएमआरके महिला महाविद्यालयातही यंदा हा प्रयोग राबविण्यात येत आहे. अर्थात त्यावर शिक्षकांचा ‘रिमोट कंट्रोल’ राहणारच आहे.
शहरातील सर्व महाविद्यालयांपेक्षा वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमांसाठी प्रसिध्द असलेल्या एसएमआरकेचे गॅदरिंग १७ ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
आठवडाभराच्या गॅदरिंगसाठी विद्यार्थिनींची धावपळ सुरू झाली आहे. महाविद्यालयात या संपूर्ण स्पर्धा, डेज्ची माहिती देणारे तक्ते आकर्षकरित्या लावण्यात आले आहेत. विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी संघटनेने गरबा आयोजित केला असून या गरबा नृत्यात कॉलेजबाहेरील मुलींनाही सहभागी होण्याची संधी आहे. गरबा नृत्य स्पर्धेत अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याचा लाभ बाहेरील मुली महाविद्यालयाशी संपर्क साधून घेऊ शकतात, असे आवाहन प्राचार्या दीप्ती देशपांडे यांनी केले आहे.
उत्साहाच्या या वातावरणात तरुणींच्या आनंदाला उधाण येणार आहे हे नक्कीच.
अत्यंत जोरदार परंतु तेवढीच शिस्तबद्ध तयारी जणूकाही ‘हम भी है जोश में’ हाच संदेश देऊ पाहत आहे. तरुणाई सतत धाव घेत असते नवनवीन गोष्टींकडे. एक गोष्ट झाली की लगेच दुसऱ्या गोष्टीचे वेध. कॉलेजरोड वरील महाविद्यालय म्हणजे बारा महिने गोंगाटच गोंगाट. मग तो गोंगाट असतो मस्तीचा अथवा पोलिसांनी उचललेल्या बडग्याचा अर्थात शिस्तीचा. काहीही असले तरी तरुणांच्या हक्काचे दिवस काही दिवसांवर येऊ ठपले आहेत.
एसएमआरके हे सर्व डेज्, स्पर्धा आठवडाभर साजरा करणार आहे. ‘पावर पॉइंट प्रेझेन्टेशन, पालक मेळावा, नेल आर्ट, पुष्प रचना, पाककला, मेहेंदी स्पर्धा, क्वीझ, टॅटू स्पर्धा, ट्रेझर हंट, स्पॉट फोटोग्राफी, फन फेअर, गरबा स्पर्धा, मिस् एसएमआरके, अशा विविध स्पर्धा व कार्यक्रमांचा यांमध्ये समावेश आहे. मागील वर्षांपेक्षा यंदा पाच नवीन स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. या स्पर्धासाठी शिक्षकवृंद, प्राचार्य यांचे सहकार्य व मार्गदर्शन असले तरी यंदाच्या कार्यक्रमाची अधिकाधिक जबाबदारी विद्यार्थिनींनी उचलली आहे.
विद्यार्थिनींना यामुळे एकप्रकारे ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट्चे’ प्रशिक्षणच मिळणार आहे. विद्यार्थिनी सभेच्या प्रमुख प्राध्यापिका मंजुषा भाके आहेत.
न्यू इयर आणि डेज्चा दुग्धशर्करा योग तरुणाईच्या आनंदाला जणू उधाणच आणणार आहे. महाविद्यालयांमधील उत्साह, विविध उपक्रम आणि त्यांच्या तयारीसाठी तरुणाईने ओतलेला ‘जीव’ हे सर्वच काही महत्वपूर्ण. विविध स्पर्धामध्ये मारलेली बाजी असो अथवा हाणामाऱ्या. त्यापलिकडे बघणाऱ्या तरूणाईचा उत्सव म्हणून गॅदरिंगकडे पाहिले जाते. एसएमआरकेच्या मुली तर मुलांच्या तोडीस तोड. विविध उपक्रमांच्या अग्रभागी त्याच दिसतात. शैक्षणिकदृष्टय़ा विविध अभ्यासक्रमांमध्ये हे महाविद्यालय नावलौकिक मिळवून आहेच, शिवाय सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही महाविद्यालय अव्वल आहे. त्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाप्रमाणेच विद्यार्थिनींकडून भरभरून मिळणारा प्रतिसाद मोलाचा म्हणावा लागेल. त्यामुळेच तर  प्रत्येक विद्यार्थिनी स्पर्धेच्या आधीच स्वत:ला ‘मिस् एसएमआरके’ समजू लागली आहे. तितकं टॅलेन्ट असेल तर तिने का समजू नये स्वत:ला मिस् एसएमआरके ?