येथील पोलिसांच्या कोठडीतील कैद्यांना गुरुवारी दिवसभर पाणी व जेवण मिळाले नाही. त्यामुळे जेलच्या दरवाजावर थाळय़ा वाजवून कैद्यांनी आक्रोश केला. याबाबत माहिती घेतली असता कैद्यांना जेवण देणाऱ्या कंत्राटदाराचे बिल नऊ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे त्याने आज जेवण दिले नाही असे समजते.
कर्जत येथे पोलीस ठाण्याच्या आवारातच कोठडी आहे. या कोठडीत १६ कैदी आहेत. या कैद्यांना विठ्ठल जालिंदर गोंजारे एक वेळचा नाश्ता, दोन वेळा जेवण, चहा व पाणी पुरवण्याचे काम टेंडरप्रमाणे घेऊन पुरवतात. मात्र गोंजारे यांना जानेवारी महिन्यापासून जेवणाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांचे ७ लाख ५० हजार रुपये थकले आहेत. या थकबाकीसाठी त्यांनी आज कैद्यांना जेवण व नाश्ताही दिला नाही. हे पैसे थकल्याने गोंजारे यांना बाजारात देणे झाले आहे. त्या देण्यामुळे त्यांनाही बाजारात भाजीपाला, धान्य मिळेनासे झाले आहे. त्यासाठी रोख पैसे खर्च करण्याची आता आपली ऐपत नसल्याची कैफियत त्यांनी मांडली.
या सर्व प्रकाराला जेलरच जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. कारण कैद्यांच्या संख्येनुसार येथे निधी मिळतो, मात्र वरिष्ठ कार्यालयाला याबाबतचा हिशोबच वेळोवेळी सादर न झाल्याने हा निधी थांबला असल्याचे सांगण्यात येते. येथे नियमितपणे हिशोब लिहिलेच जात नाही. आज दुपापर्यंत जेवणाची वाट पाहून नंतर भूक लागल्याने या सर्व कैद्यांनी जोरदार थाळी वाजवत येणाऱ्यांचे लक्ष वेधले. जेवणासाठी ते कासावीसही झाले होते. मात्र त्यांना आज लंघनच करावे लागले.