शहरात ३० वर्षांपासून कायद्यानुसार रिक्षा मीटरप्रमाणे भाडे आकारत नाहीत. रिक्षात तीनपेक्षा अधिक प्रवासी बसतात. या अनुचित व्यापारी प्रथेस रिक्षा संघटना, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप जिल्हा ग्राहक पंचायतीने केला आहे. ग्राहकांना सर्व सेवा कायदेशीरपणे मिळाव्यात म्हणून दोन ऑक्टोबरपासून ‘रिक्षा सेवा कायदे पाळा’ आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे यांनी दिली आहे.
जिल्हा ग्राहक पंचायत जिल्हाधिकारी, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडे २० वर्षांपासून शहरात कायद्यानुसार रिक्षा सेवा मिळाव्यात म्हणून मागण्या मांडत आहे. परंतु त्यांच्याकडून हा विषय गंभीरपणे घेतला जात नाही. ग्राहक पंचायतीने सर्व रिक्षांना ई-मीटर चाचणी करून बसवावे, मीटरप्रमाणे रिक्षा सेवा व मीटरप्रमाणे सीट-शेअर रिक्षा प्रत्येक थांब्यावर स्वतंत्रपणे उभ्या कराव्यात. तेथे तसे फलक लावावेत, मीटरप्रमाणे रिक्षा सीबीएस, पंचवटी, ठक्कर बाजार, रविवार कारंजा, महामार्ग स्थानक या ठिकाणाहून पुण्याप्रमाणे प्री-पेड रिक्षा सेवा द्याव्यात, या सर्व ठिकाणी मीटरप्रमाणे शेअर रिक्षांचे स्वतंत्र थांबे करावेत, तेथे तीन सीटच्या शेअर रिक्षांचे प्रमाणित भाडे आकार तक्ता लावावा व त्याप्रमाणेच भाडे घ्यावे, गणवेश न घालणे, बिल्ला, फोटो न लावणे, मीटरप्रमाणे भाडे न घेणे, तीन सीटपेक्षा जादा सीट घेणे, चालकाशेजारी ग्राहकास बसविणे, अरेरावीने वागणे, भाडे नाकारणे या स्वरूपाच्या तक्रारी ग्राहकांनी केल्यास रिक्षांना दंड व परवाना रद्द करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.
‘नो पार्किंग’ मध्ये लावलेल्या रिक्षा वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेऊन दंड करावा, प्रत्येक रिक्षात वाहक सीटामागे आरटीओ प्रमाणित मीटर भाडे व शेअर रिक्षा भाडे तक्ता लावावा, मीटर अप्रमाणित व बंद रिक्षांना वाहतूक करण्यास प्रतिबंध करावा, अशा रिक्षा जप्त कराव्यात, पेट्रोलऐवजी रॉकेलवर चालणाऱ्या रिक्षा जप्त कराव्यात, ज्या भागात अनुचित प्रकारे रिक्षा चालत असतील त्या भागातील वाहतूक पोलिसाला कामात कुचराई केली म्हणून निलंबित करावे, त्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
या सर्व सेवा कायदेशीरपणे मिळाव्यात म्हणून गांधी जयंतीचे निमित्त साधत रिक्षा सेवा कायदे पाळा आंदोलन पंचायतीच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शासकीय रिक्षा तक्रार कार्ड ग्राहकांना वाटप करण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती पंचायतीचे पदाधिकारी विलास देवळे, अनिल नांदोडे, सुहासिनी वाघमारे यांनी दिली आहे. आंदोलनात  सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून माहितीसाठी ९४२२२६६१३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.