पाचगणी आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाचगणीपासून जवळच असणा-या गणेशपेठ (ता.जावली) येथे जमिनीला भेगा पडल्याने भिंतीना तडे जाऊन घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील एका कुटुंबाला खबरदारीचा उपाय म्हणून इतरत्र हलवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की रूईघर (ता.जावली) या गावाची गणेशपेठ ही वस्ती पाचगणीपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसली आहे. पाचगणीहून पाचवडला जाणा-या काटवली घाटात गणेशपेठ येथील मिळकत नं. १७७ मध्ये जमिनीला मोठमोठय़ा भेगा पडल्या आहेत. या ठिकाणी असणा-या हणमंत कृष्णा बेलोशे यांच्या घराचा परिसर भेगा पडून खचून गेला आहे. तर त्यांच्या घराच्या सर्व िभतीना तडे जाऊन घर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यांच्या घराशेजारी असणारी संरक्षक िभत ही बेलोशे यांच्या घरावर येऊन कोसळली आहे त्यामुळे बेलोशे यांच्या घराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पध्दतीने घाटाच्या मुख्य रस्त्यालाही याच परिसरात भेगा पडल्या असून रस्ता धेाकादायक बनला आहे. या सर्व भेगा मुसळधार पावसामुळे आणखीनच मोठय़ा होत असल्याने या परिसरातील वस्तीत भीतीचे वातारवरण पसरले आहे.
आज सकाळी रूईघरच्या सरपंच कामिनी सपकाळ, उपसरपंच संगीता बेलोशे यांच्यासह करहर सजाचे मंडल अधिकारी प्रशांत कोळेकर, तलाठी जे.डी.गाडे, ग्रामसेवक के.पी.पोमणे यांनी सदर जागेची पहाणी करून पंचानामा केला आहे. हणमंत बेलोशे यांच्या कुटुंबाला धोका असल्याने त्यांना तातडीने सुरक्षिततेसाठी दुस-या ठिकाणी हलवले आहे.
गणेशपेठ या परिसरात धनदांडग्या लोकांनी डोंगररांगात जमिनी खरेदी करून उत्खनन करून सपाटीकरण करीत आपले बंगले उभारण्याचा सपाटा लावला आहे. याचा परिणाम म्हणून अशा प्रकारे जमीन सरकण्याचे, खचणे व जमिनीला भेगा पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महसूल विभागाला हाताशी धरून धनदांडग्यांचे डोंगर पोखरण्याचे हे सत्र थांबले नाही तर नजीकच्या काळात असे प्रकार वारंवार घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
 दरम्यान महाबळेश्वरसह पाचगणी परिसरात आज मुसळधार पाऊस कोसळत असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी वृक्ष पाडण्याचे प्रकार घडले आहेत. आज सकाळपर्यंत पाचगणी शहरात ३९ मीमी पाऊस पडला असून आजअखेर ११५९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cracks to houses and lands due to huge rainfall in panchgani
First published on: 02-08-2013 at 02:03 IST