२१ व्या शतकातील अत्याधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने थाटले आहेत. खुलेआम सुरू असलेले हे दवाखाने नागरिकांसाठी यमदूत ठरत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तब्बल २६ बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील १९ डॉक्टरांचे अद्याप दवाखाने सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
झोपडपट्टीबहुल परिसरात या बोगस डॉक्टरांचा सर्वाधिक भरणा आहे. काही दिवसापूर्वी खारघर परिसरात जितेंद्र भोसले या बोगस डॉक्टराने डायग्नोस्टिक सेटर सुरू केले असल्याचे समोर आले. या बोगस डॉक्टराचे बिंग वाशीतील डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या दक्षतेमुळे फुटले. गेल्या चार महिन्यापासून बिनबोभाट सुरू असलेल्या भोसले याच्या सेंटरमधून अनेक रुग्णांना रक्त तपासणीचे अहवाल देण्यात आले होते. वैद्यकीय पदवी नसताना शहरात या बोगस डॉक्टरांनी थाटलेले दवाखाने म्हणजे साक्षात यमदूत असल्याचे अनेक प्रसंगांतून पुढे आले आहे. दोन वर्षांपूर्वी कंपाऊंडर असलेल्या एका व्यक्तीने तुभ्र्यात दवाखाना सुरू केला होता. या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांनादेखील गुण येत असल्याने सातत्याने गर्दी होत असे. मात्र एकदा एका चिमुरडीला दिलेल्या चुकीच्या इंजेक्शेनमुळे त्या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय विभागाने केलेल्या चौकशीत या बोगस डॉक्टरचे सत्य उघडकीस आले होते. पोलीस तपासात कंपाऊंडर ते डॉक्टर हा थक्क करणारा त्याचा प्रवास समोर आला होता. यानंतर बोगस डॉक्टरांच्या विरोधात आरोग्य विभागाने मोहीम उघडत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत तब्बल २६ बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील ७ डॉक्टरांनी त्यांचा बाडबिस्तरा आवरत दवाखाने बंद केले आहेत. मात्र शहरात त्यातील १९ बोगस डॉक्टरांचे दवाखाने आज ही खुले आम सुरू असून तेथे येणाऱ्या रुग्णांच्या जिवाशी हे डॉक्टर खेळत असल्याचे विदारक सत्य आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे दवाखाने बंद केलेल्या अनेक डॉक्टरांनी इतर परिसरात दवाखाने सुरू केल्याचे आरोग्य विभागाच्या कारवाईतून समोर आले आहे. यामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर अंकुश कोण ठेवणार असा सवाल उपस्थित होत आहे.महापालिकेच्या वतीने २६ बनावट खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात बनावट डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयात खटले सुरू आहेत.
डॉ.रमेश निकम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका