शाळा, महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांना टारगटांचा होणारा त्रास रोखण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आपल्या स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केल्या असल्या तरी मुळात राजकीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांकडूनच हे प्रकार अधिक होत असल्याने त्यांच्याकडे मदत मागणाऱ्यांचे प्रमाण अगदीच कमी आहे. अशा स्थितीत भारतीय कृषक समाजाने १०० महिलांचा समावेश असलेल्या ‘दामिनी’ पथकाची स्थापना केली आहे. छेडछाडीचे प्रकार घडल्याची माहिती समजल्यानंतर हे पथकच उपरोक्त ठिकाणी धडक मारून टवाळखोरांचा समाचार घेणार आहे.
या शिवाय, प्रत्येक युवतीने स्वरक्षणासाठी स्वयंपूर्ण व्हावे, याकरिता हे पथक शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना ‘मार्शल आर्ट’चे प्रशिक्षणही देणार आहेत. या पथकातील सर्व सदस्य महिलाच राहणार असल्याने अन्यायग्रस्त मुली व महिला निसंकोचपणे आपले म्हणणे त्यांच्याकडे मांडू शकतात.
नवी दिल्ली येथे युवतीवर झालेला बलात्कार व त्यानंतर तिचा मृत्यू, सुरगाणा तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेत बारावीच्या विद्यार्थिनीवर झालेली बलात्काराची घटना, सातत्याने होणारी छेडछाड या पाश्र्वभूमीवर, भारतीय कृषक समाजाने महिलांच्या संरक्षणासाठी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. संघटनेच्या प्रभारी ज्योती सुरसे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. पथकात १०० महिलांचा समावेश असून पहिल्या टप्प्यात त्यांना ‘मार्शल आर्ट’ प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुरूवारी दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मारकात या उपक्रमाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती सुरसे यांनी दिली. साधारणत: महिनाभराचे प्रशिक्षण पथकातील महिला व युवतींना दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित महिला प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनींना प्रशिक्षण देतील. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत कधी पोलीस यंत्रणा तर कधी राजकीय पक्षांना दोष दिला जातो. परंतु, कोणाला दोष देण्याऐवजी महिलांनी स्वत:चे संरक्षण करण्यास स्वत: सक्षम व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील बहुतेक शाळा व महाविद्यालयांत विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेचे वातावरण नसते. बाहेरून येणाऱ्या टवाळखोर मंडळींचा  परिसरात धुमाकूळ सुरू असतो. कट्टे अथवा कॅम्पस्च्या परिसरातील टोळक्यांकडून युवतींची छेडछाड केली जाते. ही बाब लक्षात घेऊन दामिनी पथकाने अशा टवाळखोरांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘महिलांची सुरक्षितता व मदतीसाठी सदैव तत्पर’ अशा दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली. ९६२३७ १४२९९, ९६२३७ १४२९९ या हेल्पलाईन क्रमांकावर युवती वा महिलांनी अशा प्रकारांची माहिती दिल्यास टवाळखोरांचा दामिनी पथक त्वरित बंदोबस्त करेल, असे सुरसे यांनी नमूद केले. या शिवाय, महाविद्यालयांच्या परिसरात फिरून हे पथक टवाळखोरांना धडा शिकविणार आहे. दरम्यान, महिलांवरील अत्याचारांबाबत भारतीय कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे. रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बस व रेल्वेत स्वतंत्र
गस्ती पथकाची नेमणूक, प्रत्येक
पोलीस ठाण्यांतर्गत महिला दक्षता समितीची पुन्हा स्थापना करावी, बलात्काराच्या गुन्ह्यात शासकीय
सेवक संशयित असेल तर त्यास निलंबित करावे, गुंडा अ‍ॅक्टची अमलबजावणी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damini pathak for womens security
First published on: 03-01-2013 at 02:22 IST