पतंग उडविताना आवश्यक ती काळजी न घेता पतंग उडविण्याचा जल्लोष अकोल्यातही कायम होता. वाऱ्याचा जोर कमी असल्याने सकाळी पतंगबाजी थोडी कमीच झाली. रस्त्यावर पतंग लुटणारे व त्यांच्या हातातील काटय़ा अनेकांच्या ह्रदयाचे ठोके वाढवित होता. आकाशात पतंग उंच जावी, या एकमेव उद्देशाने बांधकाम सुरू असलेल्या संकुलावर पतंगबाजी करणारी मुले जीवघेण्या स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करत होते.
आज सकाळपासून संक्रातीनिमित्त पतंग महोत्सव चांगलाच रंगला. घराघरात, गच्चीवर, खुल्या मैदानात, रस्त्यावर पतंग उडविणारे सर्वत्र दिसत होते. लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंत सर्वानी या आनंद सोहळ्यात भाग घेतला. चिनी नायलॉन मांजा, देशी बरेली, स्थानिक मांजा घेऊन पतंग दिवसभर आकाशात उडविण्याचा ध्यास सर्वानी घेतलेला होता. या पतंगबाजीत आकाशात उंचावरून पतंग उडविण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या एका संकूलाच्या पाचव्या मजल्यावर पतंग उडविणाऱ्या मुलांकडे ना पालकांचे लक्ष होते ना बांधकाम व्यावसायिकांचे, असे दृष्य अकोला शहरातील एका ठिकाणचे होते. अशा संकुलाचे उघडय़ावर असलेले लोखंड व नसलेले कठडे पाहिल्यावर अपघाताची भीती आपसूक निर्माण होत होती. पतंग उडविणाऱ्या या मुलांना मात्र कसलीच भीती वाटत नव्हती. ते बिनधास्त पतंग उडवित होते. अनेक ठिकाणी गच्चावर मोठय़ा आवाजात हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या सान्निध्यात पतंग उडविण्यात अनेकांनी रस घेतला. अकोल्यात पतंग उत्सव शांततेत पार पडला.
प्लास्टिक पतंग व नायलॉन मांज्या नको
हा पतंग उत्सव पर्यावरणास घातक असल्याने प्लास्टीकची पतंग व नायलॉनच्या मांज्याचा वापर करू नये, अशी मागणी सातपुडा फांऊडेशनच्या अमोल सावंत यांनी केली आहे. पर्यावरणास घातक असलेला प्लास्टीकची पतंग प्रदूषणास कारणीभूत ठरतो. त्यामुळे नाल्या तुंबणे, गाई-म्हशींनी खाल्ल्यास त्यांना आजार होऊ शकतात. त्यामुळे प्लास्टीकचा कागद असलेल्या पतंगावर बंदी आणण्याची मागणी सावंत यांनी केली. नायलॉन मांज्यामुळे पक्ष्यांना मोठी बाधा झालेली आहे. त्यामुळे नागरिकांनीही दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी प्लास्टिक पतंग व नायलॉन मांज्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.