धावपळीच्या जीवनात दररोज भाजी मंडईत जायला वेळ नाही आणि रोजचे बाहेरचे खाणेही परवडत आणि पटत नाही. त्यामुळे थेट भाजी पोळी केंद्रातून वा हॉटेलातून भाजी खरेदी करण्यापेक्षा बाजारात उपलब्ध असलेल्या निवडलेल्या आणि चिरलेल्या आयत्या भाज्या घेणे आता ठाण्यातील गृहिणी पसंत करू लागल्या आहेत. त्यामुळे मोठमोठय़ा किराणा मॉलपाठोपाठ आता पदपथांवरही चिरलेल्या, फोडणीसाठी तयार भाज्यांची पाकिटे उपलब्ध होत आहे. ठाण्यातील गोखले रस्त्यावर तर सायंकाळी अशा ‘तयार’ भाज्यांचा बाजारच भरलेला आढळतो.
नव्या ठाण्याचा अविभाज्य घटक असलेल्या मॉल संस्कृतीत तयार भाज्यांची पाकिटे पूर्वीपासून मिळतात. मात्र त्यात सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाज्यांचा समावेश असल्याने त्या खूपच महाग असतात. मध्यमवर्गियांना त्या परवडत नाहीत. त्या तुलनेत आता रस्त्यावरील हातगाडय़ांवर मिळणाऱ्या निवडेल्या भाज्या खूपच स्वस्त आहेत. शिवाय त्या धुतलेल्या आणि स्वच्छ केलेल्या असल्याने गृहिणींचा त्यामुळे वेळ वाचतो. अनेक महिला संध्याकाळी भाज्यांची दोन पाकिटे घेऊन जातात. त्यातील एक रात्रीच्या स्वयंपाकासाठी तर दुसरी सकाळच्या डब्यासाठी असते. सायंकाळी सातनंतर  गोखले रोडवर तर फोडणीसाठी तयार भाज्यांची पाकिटे विकत घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते.  
या व्यवसायामुळे अनेक गृहिणींनाही घरच्या घरी रोजगार मिळाला आहे. भाज्या धुणे, निवडणे आणि चिरणे हा एक नवा उद्योग भरभराटीला आला आहे. भाज्यांना ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून आता घरी तयार केलेल्या मसाल्याची पाकीटेही रेल्वे स्थानक ते गोखले मार्गावर मिळू लागतील, असा दावा रावसाहेब कळंबेकर या विक्रत्याने दिली.

‘रेडी टू फोडणी’
भेंडी, गवार, मेथी, फ्लॉवर, पालक, फरसबी, कोबी अशा अनेक भाज्या येथे उपलब्ध असतात. भेंडी ही भाजी धुवून चिरल्यावर चिकट होते. त्यामुळे भेंडी स्वच्छ धुवून कापुन सुकवून विक्रीसाठी येथे ठेवली जाते. तसेच मेथी, पालक यासारख्या भाज्यांना खूप वेळ खर्ची घालावा लागतो. तयार भाज्यांमुळे स्वयंपाकाच्या आघाडय़ांवरील त्यांचे प्रश्न काही प्रमाणात सोपे झाले आहेत, अशी माहिती अशी पाकिटे तयार करून विकणारे विक्रेते रवी कुरडेकर यांनी दिली. रोजच्या भाज्यांबरोबर विविध पदार्थासाठी लागणाऱ्या भाज्या एकत्र करून ‘रेडी टू फोडणी’ ही संकल्पना कुरडेकर यांनी आणली आहे.

पुलाव मिक्सपासून चायनीजपर्यंत
तयार भाज्यांच्या सोबतीला सांबारापासून पुलावापर्यंत वेगवेगळ्या जिन्नसात लागणाऱ्या भाज्या व्यवस्थित चिरुन त्यांची बंद पाकीटे विकण्याचा घाऊक धंदाही ठाण्याच्या पदपथांवर तेजीत आला आहे. सांबार मिक्स, पुलाव मिक्स, चायनिज पदार्थासाठी लागणाऱ्या भाज्यांची पाकिटे याठिकाणी विक्रीसाठी ठेवली आहेत.