रस्ता रुंदीकरणात विस्थापित झालेल्यांना भूखंडवाटपाचा कार्यक्रम महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विरोध न जुमानता घडवून आणला. भूखंडवाटपाची प्रक्रियाही झाली. पण जे भूखंडवाटप करण्यात आले, ती जागाच महापालिकेच्या मालकीची नसल्याने कैलासनगर, फुलेनगर भागातील नागरिक संभ्रमित झाले आहेत. दरम्यान, या भागातील पाडापाडीही खासदार खैरे व आयुक्त डॉ. भापकर यांच्यातील मतभेदामुळे थांबली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आयुक्त डॉ. भापकर यांचा खासदार खैरे यांनी अपमान केला. त्यानंतर आयुक्त पदावरून बदली झालेल्या भापकर यांनी प्रशासकीय अधिकार नक्की काय असतात, हे जणू दाखवून देण्याचेच ठरविले असल्यासारखा कार्यक्रम आयोजित केला. भूखंडवाटप कार्यक्रमास महापालिका प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले गेले नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या दोन आमदारांना मात्र आवर्जून निमंत्रित करण्यात आले. खासदार खैरे यांचा भूखंडवाटपास विरोध असल्याचे सांगण्यात येते.
या पाश्र्वभूमीवर आयुक्तांनी घेतलेल्या कार्यक्रमामुळे पालिकेत अधिकारी विरुद्ध पदाधिकारी असे चित्र निर्माण झाले. यात भर म्हणून महापौर कला ओझा यांनी रस्ता रुंदीकरणासंबंधित माहिती मागविण्याच्या निमित्ताने आयुक्त डॉ. भापकर यांना खरमरीत पत्र लिहिले. या पत्राच्या अनुषंगाने महापौर ओझा यांना विचारले असता, काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.
त्याचा खुलासा आयुक्तांकडून हवा होता. तो मिळावा, असे पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले. भूखंडवाटपाच्या कार्यक्रमानंतर महापालिकेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.