आर्थिक कारणे पुढे करून पाण्याचे प्रकल्प टाळणे यापुढे शक्य होणार नाही असा स्पष्ट निर्वाळा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. विशेषत: कोकणातून समुद्राला वाहून जाणारे १०० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबत राज्य सरकारला आता गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यादृष्टीनेच नगर, नाशिक व मराठवाडय़ातील नेते व पाण्याचे जाणकार यांची लवकरच संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले.
 वांबोरी चारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी व या लाभक्षेत्रातील शेतक-यांची बैठक आज येथे बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य सुभाष पाटील, वसंत कापरे, गोवर्धन घोलप आदी या वेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, पाणीप्रश्नावरून नगर विरुद्ध मराठवाडा असा विनाकारण वाद निर्माण झाला आहे. गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात माठे खोरे आहे. मात्र ते तुटीचे असून धरणांच्या लाभ क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने जायकवाडीला पाणी सोडावे लागले. त्यामुळे नगर व नाशिकमध्ये असंतोष निर्माण झाला. यंदा जायकवाडीला चांगल्यापैकी पाणी गेले आहे. वर विनाकारण पाणी अडवून ठेवण्यात आले असा समज मराठवाडय़ाने करून घेऊन नये. घाटमाथ्यावरील वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे हाच एकमेव पर्याय आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे गेल्या ३५ वर्षांपासून त्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्याचे गांभीर्य कोणाला नव्हते. यापुढे त्याबाबत पैशांची अडचण दाखवून चालणार नाही. निदान सर्वेक्षण तरी तातडीने सुरू केले पाहिजे असे ते म्हणाले.
ओव्हरफ्लोच्या पाण्यावर पाणीपट्टी आकारणे आपल्याला अमान्य असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ही पाणीपट्टी आकारूच नये. समन्यायी पाणी वाटपाच्या नवाखाली केवळ कायद्याने पाण्याचे प्रश्न मिटणार नाहीत. प्रत्येकजण स्वत:च्या सोयीने अर्थ काढतो, त्यामुळेच पाणीप्रश्नाला नाहक प्रादेशिक वादाचे स्वरूप प्राप्त झाले असे विखे म्हणाले.
 वांबोरी चारीला गुरुवारपासून पाणी
मुळा धरणातून वांबोरी पाइप चारीला येत्या गुरुवारपासून आवर्तन देण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती विखे यांनी दिली. ते म्हणाले, या योजनेच्या थकीत बिलापैकी ३५ लाख रुपये भरण्यात आले आहेत. उर्वरित भरल्यानंतर या योजनेची वीजजोडणी तातडीने जोडण्यात येणार आहे. या योजनेचा दुसरा टप्पाही मंजूर झाला असून वर्षभरात तो पूर्ण होईल, मात्र तोपर्यंत आवर्तनाच्या काळात पुरेसा बंदोबस्त ठेवून पोलिसांनी गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चारी फुटण्याचे प्रकार थांबतील असे विखे म्हणाले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont possible to avoid water project due to economic reasons radhakrishna vikhe
First published on: 27-08-2013 at 01:48 IST