शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या २३ जानेवारी या जन्मदिनानिमित्त शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारलेल्या २८० व्यंगचित्रांचे प्रदर्शन, महारक्तदान शिबीर आणि संतवाणी या कार्यक्रमांचा समावेश आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या २८० व्यंगचित्रांचे प्रदर्शन गडकरी रंगायतनमध्ये २३ ते २५ जानेवारी या कालावधीत भरविण्यात येणार असून सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांना हे प्रदर्शन पाहता येईल, अशी माहिती आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली. टिपटॉप प्लाझामध्ये २३ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता गडकरी रंगायतनमध्ये शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ज्येष्ठ  गायक पं. उपेंद्र भट आणि त्यांचे सहकारी संतवाणी सादर करणार आहेत. दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक चित्रकला स्पर्धा  दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहामध्ये होणार आहे. त्यात पालिकेच्या वतीने दीड लाख रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
बदलापूरमध्येही रक्तदान, रांगोळी
बदलापूरमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून त्यात २५ महिलांचा समावेश आहे. पूर्व भागातकाणे सांस्कृतिक सभागृहामध्ये प्रख्यात रंगावलीकार अशोक मेस्त्री आणि त्यांचे सहकारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘व्यक्तिचित्र रंगावली कला’ साकारणार असून २७ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.