मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील अपघातांप्रकरणी संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने लालबागचा उड्डाणपूल व पूर्व मुक्त मार्गावरील गेल्या दोन वर्षांतील अपघातांबद्दल ‘सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबईत ठिकठिकाणी मेट्रो रेल्वे, मोनोरेल, पूर्व मुक्त मार्ग आदी प्रकल्पांचे काम सुरू आहे. सतत कोणत्या ना कोणत्या प्रकल्पस्थळावर अपघातांची मालिका सुरू असते. त्यात मजुरांचे, प्रवाशांचे जीवही गेले. पण दरवेळी अपघात तांत्रिक कारणांमुळे घडला असा चौकशी अहवाल देऊन प्रकरण संपते.
मेट्रो रेल्वेचे स्थानक बांधले जात असताना अंधेरीत विमानतळाजवळ जिन्याचा सांगाडा कोसळून अपघात झाला. त्यात एक ठार तर १६ जण जखमी झाले. यानंतर ‘प्राणघातक अपघातांच्या मालिकेनंतरही कंत्राटदार मोकाटच!’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर अपघातांप्रकरणी संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. या पाश्र्वभूमीवर नोव्हेंबर २०१० मधील बांधकाम ट्रॉली लालबाग उड्डाणपुलावर पडून झालेला अपघात, जून २०११ मध्ये उद्घाटनानंतर आठवडाभरात पुलावर पडलेला खड्डा, एप्रिल २०१२ मध्ये पुलाच्या खालच्या बाजूचा काँक्रिटचा तुकडा कोसळणे, जुलै २०१२ मध्ये पूर्व मुक्त मार्गावर गर्डर बसवताना झालेल्या अपघातात दोन मजूर ठार, तर सहा जखमी झाल्याबद्दल ‘सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर’ला प्राधिकरणाने पत्र पाठवून एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या चारही अपघातांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांची पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसते. त्यामुळे हा दंड आकारण्यात येत असून, यापुढे अशी घटना घडल्यास प्राधिकरणाच्या प्रकल्पाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत बंदी घालण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fine on simplex for accidents on infrastructure project work
First published on: 20-12-2012 at 11:51 IST