मधुकर पिचड यांना दिलेला न्याय सोलापूरच्या कोळी बांधवांनाही हवा

आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या जातपडताळणीमध्ये जे निकष लावण्यात आले, तेच निकष सोलापूर जिल्हय़ातील कोळी समाजासाठीही लावण्यात यावेत, अशी मागणी करीत महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कोळी जातीचा उल्लेख असलेल्या आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या जातपडताळणीमध्ये जे निकष लावण्यात आले, तेच निकष सोलापूर जिल्हय़ातील कोळी समाजासाठीही लावण्यात यावेत, अशी मागणी करीत महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी १८ मे २०१३ रोजीच्या शासन परिपत्रकाची होळीही करण्यात आली.
१८ मे २०१३ रोजीचा शासनाचे परिपत्रक कोळी समाजबांधवांचे जीवन उद्ध्वस्त करणारे असून, विशेषत: १५ जून १९९५नंतर शासकीय-निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या कोळी समाजाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भवितव्य संपुष्टात येणार आहे. त्यामुळे कोळी समाजबांधवांत संताप व्यक्त होत असून त्याचीच प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या सोलापूर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासन परिपत्रकाची जाहीर होळी केली. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष पंचप्पा हुग्गे व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुधाकर सुसलादी, व्यंकट तातोडे, गणेश कोळी, कपिल कोळी, प्रकाश शेतसंदी, विश्वनाथ कोळी, कमल ढसाळ, भारती कोळी, शोभा कोळी, सुरेखा कोळी आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. आंदोलनस्थळी दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने, शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजय देशमुख तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आदींनी धाव घेऊन आंदोलकांची भेट घेतली. कोळी समाजाच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार माने यांनी सांगितले. तर कोळी समाजाबरोबर आपणही असल्याची ग्वाही आमदार देशमुख यांनी दिली.
अलीकडेच मंत्रिमंडळात वर्णी लागलेले आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्या जातीच्या दाखल्यावर कोळी असा उल्लेख आहे. त्यांच्या नातेवाइकांच्या दाखल्यावरही कोळी जातीचाच उल्लेख आहे. त्यांची जातपडताळणी होते. तर सोलापूर जिल्हय़ातील कोळी समाजबांधवांना जातपडताळणीमध्ये नाकारले जाते. पिचड यांना जो न्याय दिला जातो, तोच न्याय सोलापूरच्या कोळी बांधवांना का मिळत नाही, असा सवाल पंचप्पा हुग्गे यांनी उपस्थित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fishermen wants justice like madhukar pichad