समाजातील दुर्लक्षित व्यक्तींना अर्थसहाय्य देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास उंचाविण्यासाठी काही सामाजिक व स्वयंसेवी संस्था मानवतेचा विशाल दृष्टीकोन ठेवून प्रसिद्धी परांड्:मुख राहून सतत प्रयत्नशील असतात. अमरावती येथील ‘अनामप्रेम’ या स्वयंसेवी संस्थेच्या वयोवृद्ध कार्यकर्त्यांनी कुसूमवाडे येथील अनाथ मुलगी गंगा हिला अर्थसहाय्य करून समाजापुढे एक उदात्त उदाहरण ठेवले आहे. अत्यंत कोवळ्या म्हणजे दहा वर्षांच्या गंगावर अकाली आलेली कौटुंबिक जबाबदारी ती समर्थपणे पेलते आहे. तिच्या या विलक्षण कहाणीवर ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोत टाकला होता.
नंदुरबार जिल्ह्यातील कुसुमवाडे येथील गंगा भिल ही आई-वडिलांच्या पश्चात तिच्या चार भावंडांना सांभाळत आहे. या सर्व भावंडांची ती आई झाली असून ती स्वत:ही शिक्षण घेते आणि त्यांनाही शिकविते. शहादा येथील प्रा. दत्ता वाघ यांनी गंगाचे हे झगडणे आणि तिने स्वीकारलेले पालकत्व, याचा पट महिला दिनाचे औचित्य साधून मांडला होता. तिची ही कहाणी वाचून अमरावती येथील अनामप्रेम या स्वयंसेवी संस्थेचे वयोवृद्ध कार्यकर्ते सुहास आंबेकर आणि कमलाकर कापसे यांनी कुसूमवाडे येथे स्वत: भेट देऊन गावातील सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांच्या समक्ष तिची भेट घेतली आणि तिला त्यांच्या क्षमतेनुसार अर्थसहाय्य केले.
समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने अनामप्रेम या संस्थेची स्थापना झाली आहे. संस्थेमार्फत संकटात सापडलेल्या परिचारिका, पोलीस, वाहनचालक, परितक्त्या, वेश्यांची मुले, अंध-अपंग, तृतीयपंथी अशा विविध घटकांना अर्थसहाय्य केले जाते. केवळ अर्थसहाय्यच नाही तर त्यांना जगण्याचे बळही देऊन कार्यरत ठेवले जाते, असे आंबेकर व कापसे यांनी सांगितले. अशा घटकांचा स्वाभिमान जागृत ठेऊन त्यांनी कुणाच्या दयेवर जगू नये, भिक मागू नये यासाठी आमची संस्था प्रयत्नशील असते असेही त्यांनी नमूद केले. अमरावतीहून हे कार्यकर्ते पदरमोड करून अनाथ झालेल्या गंगेला भेटण्यासाठी आले होते. त्यांच्या या दातृत्वाची कुसूमवाडय़ातील ग्रामस्थांतर्फे मनलेश जायसवाल यांनी स्वागत केले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही स्वरूपाचा सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. याप्रसंगी प्रा. दत्ता वाघ, गोसा पेंटर, अतुल शास्त्री, कृषांत देशपांडे, सरपंच कलीबाई शेमळे, उपसरपंच गुलाबसिंग भंडारी आदी उपस्थित होते. अनामप्रेमच्या कार्यकर्त्यांनी गंगा शिकत असलेल्या शाळेला आणि ती राहत असलेल्या झोपडीला भेट दिली. गंगेचा आत्मविश्वास आणि तिची कौटुंबिक बांधिलकी पाहून ते ही भारावले.