इंधन आणि वेळेचा अपव्यय
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांमधून पुणे व गोव्याला जाताना इंधन व वेळेची बचत होणारा मार्ग म्हणून नवी मुंबई (आम्रमार्ग) ते गव्हाण फाटा रस्ता ओळखला जातो. या मार्गाने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ या दोन्ही मार्गाना जोडणारा हा मार्ग आहे. मात्र या जंक्शनवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने उलट इंधन व वेळेचा अपव्यय होत आहे.
राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील गव्हाण फाटा या जंक्शनवरून उरण, पनवेल, नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणावरून जाणाऱ्या वाहनांसोबतच सध्या मुंबई- गोवा महामार्गावरील पेण, अलिबाग या मार्गावरील प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. मुंबईत पनवेल माग्रे जाण्याऐवजी मुंबई-गोवा मार्गावरील खारपाडा येथून चिरनेर माग्रे थेट गव्हाण फाटा येथे पोहचता येते. त्यानंतर पामबीच माग्रे वाशी, नवी मुंबई ते मुंबई व ठाणे परिसरातही काही वेळातच जाता येते.
त्यामुळे या मार्गाचा वापर केला जात आहे. अनेक मार्गाना जोडणाऱ्या या जंक्शनवर जेएनपीटी बंदर व बंदरावर आधारित गोदामातून ये-जा करणारी अवजड वाहनेही प्रवास करीत आहेत. या अवजड वाहनांमुळे तसेच जेएनपीटी परिसरात येणाऱ्या शेकडो हलक्या वाहनांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. चिरनेर मार्गावरून वळण घेत असताना गव्हाण फाटा येथे येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असल्याने तसेच या चौकात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याने कायम वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावरून सकाळी व सायंकाळी आपल्या नोकरी-व्यवसायानिमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत असून कधी कधी दोन ते अडीच तासांचीही कोंडी या परिसरात होत असल्याची माहिती या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे.