पाटण तालुका दुर्गम डोंगरी व अतिवृष्टीचा असून, संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात तालुका प्रशासन दिरंगाई करीत असल्याचे दिसत आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याने प्रशासकीय दिरंगाईचा लोकांना अनुभव येत आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर पाटण तालुका प्रशासनातील दिरंगाई हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी, माजी आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टी आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे तालुक्यात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होतो. दुर्गम आणि डोंगरी भागातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर होतो. यासंदर्भात संभाव्य धोके लक्षात घेऊन तालुका प्रशासनाकडून पूर्व सज्जता आवश्यक असते. तशी सज्जता प्रशासनात दिसत नाही, याचा अनुभव यंदाच्या पावसाळय़ात लोकांना येऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील अनेक रस्त्यांची, साकव पुलांची कामे अपूर्ण आहेत. डोंगरी व दुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या प्रमुख, तसेच ग्रामीण मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांची कामे आणि अनेक ठिकाणची नालेसफाईची कामे झालेली नाहीत. परिणामी पावसाच्या पाण्याने नाले तुडुंब भरून नाल्यातील पाणी रस्त्यांवर येत आहे. पावसाळय़ापूर्वी आणि सद्यस्थितीत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात फिरत असताना या बाबी प्रकर्षांने लक्षात आल्या आणि येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि विद्यमान लोकप्रतिनिधींचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याने तालुक्यातील लोकांना यंदा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. पुराचा संभाव्य धोका निर्माण होणाऱ्या कोयना नदीकाठच्या पूररेषेतील नागरिकांचे तातडीने तात्पुरते स्थलांतर करण्याच्या उपाययोजना कराव्यात, संबंधित गावांसह कोयना धरणाच्या आतील गावांना अतिरिक्त रेशनिंग धान्य व रॉकेलचा आगावू पुरवठा करावा, संभाव्य रोगराईचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवून वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अतिवृष्टीच्या काळात अखंडित वीजपुरवठा होण्याबाबत संबंधित विभागाने सतर्क रहावे, नदीकाठच्या पाणी योजना व विहिरींमध्ये पुराचे पाणी शिरून पाणी पुरवठा योजना बंद पडू शकतात. अशा गावांना टँकरने स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची तयारी असावी, ग्रामीण व डोंगरी भागातील गावांना, वाडय़ांना जोडणाऱ्या ग्रामीण मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडेझुडपे तोडणेबाबत संबंधित यंत्रणेला सूचना कराव्यात, पूर काळात संपर्क तुटणाऱ्या गावांकरिता यांत्रिक बोटींची व्यवस्था करावी, अतिवृष्टीपूर्वी तालुक्यातील प्रमुख तसेच ग्रामीण मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या नाल्याची कामे व नाले सफाईची कामे पूर्ण व्हावीत या उपाययोजनासंदर्भात शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रशासन सतर्क करावे, अशा मागण्या शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.