यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राच्या वतीने आयोजित केंद्र संयोजक व केंद्र सहायक कार्यशाळेद्वारे विविध कामांच्या नियोजनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
येथील सायन्स क्लबच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली. १३० अभ्यास केंद्रांचे १६७ प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांनी अभ्यास केंद्रांना भौतिक सुविधा देण्यात येणार असून विद्यार्थी संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी अभ्यास केंद्र प्रतिनिधींना केले. विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. एन. आर. शिंदे यांनी केंद्राच्या कार्यशैलीचा गौरव केला. विद्यार्थी मार्गदर्शन, नोंदणी प्रक्रिया, पाठय़पुस्तके वितरण आणि अभ्यास केंद्राच्या कार्यपद्धतीचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करावे, अशी अपेक्षा डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांच्याकडे नाशिक विभागीय केंद्र संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रास्ताविकात डॉ. पाटील यांनी नाशिक विभागातील विद्यार्थी संख्या गतवर्षी ९२ हजार ५४३ एवढी होती. चालू शैक्षणिक वर्षांत या संख्येत वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना नाशिक विभागीय केंद्राच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याचा मानस व्यक्त केला. माजी विभागीय संचालक पी. एस. मुसळे यांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले तर वरिष्ठ सहायक रामनाथ मालुंजकर यांनी आभार मानले.