तीन वर्षांच्या जनआंदोलनाच्या लढय़ामुळेच जनलोकपाल विधेयक मंजूर झाले. कायदे आणखी सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे संघटन उभे राहणे आवश्यक असल्याचे सांगत भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांनी या लढय़ात सामील व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हजारे यांनी म्हटले आहे, की ४६ वर्षांपासून अडकलेले लोकपाल विधेयक जनआंदोलनामुळेच मंजूर झाले. त्यामुळे ४० ते ५० टक्के भ्रष्टाचार रोखणार आहे. सरकारला जनलोकपालाचे लवकरच कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी करावी लागणार आहे. तसेच वर्षभरात प्रत्येक राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करण्यासाठी मॉडेल ड्राफ्ट तयार करावा लागेल. केवळ जनलोकपाल कायद्यामुळे भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. राईट टू रिजेक्ट, राईट टू रिकॉल, ग्रामसभेला जादा अधिकार व जनतेची सनद हे सशक्त कायदे होण्यासाठी आणखी लढाई लढावी लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर संघटन उभे राहणे गरजेचे आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर अशाप्रकारचे संघटन निर्माण झाल्यास राज्य आणि संसदेवरही मोठा दबाव निर्माण होणार आहे. त्यातूनच भ्रष्टाचाराला पूर्ण आळा बसेल अशी अपेक्षाही हजारे यांनी व्यक्त केली. या आंदोलनात सहभागी होणा-या कार्यकर्त्यांनी आपले परिचयपत्र व कार्याचा आढावा भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन, राळेगणसिद्धी, ता. पारनेर, जि. नगर या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन हजारे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hazares preparation of the new agitation
First published on: 02-01-2014 at 02:05 IST